कोटींची योजना, तरीही डोक्यावर हंडा

श्रीवर्धनमध्ये जलजीवन योजनेत कोटींचा चुराडा

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून पंच्चावन जलजीवन मिशन योजना पूर्ण होत आहेत. यामध्ये कोटींचा खर्च होऊनसुद्धा महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला नाही. सध्या भरउन्हात गावाच्या विहिरीतून डोक्यावरून घरात पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही.

नागलोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या धनगरमलई, मधलीवाडी, नागलोली, नवीवाडी, देवखोल, बोर्ला व बोर्ला रसाळवाडी या गावांना गेली कित्येक वर्षे भासत असणारी पाणीटंचाई यावेळी 1 कोटी 84 लाख जलजीवन मिशन योजनेतून दूर करण्यात आली. मात्र, सध्या याच योजनेतील पाणीपुरवठा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत. दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यात पाईपलाईन जोडणीतील बिघाड हे नेहमीचच ठरले आहे. त्यामुळे या दुर्गम भागातील पाणीटंचाईचे सावट कायम असून, कोटी रुपयांची जलाजीवन योजना येथील नागरिकांसाठी निरुपयोगी ठरली आहे.

त्याचप्रमाणे चिखलप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या शिरवणे गावात नुकतीच जलजीवन मिशनची पाणी योजना राबवली. मात्र, 19 लाखांची योजना राबवूनदेखील गावकऱ्यांना पाण्याची उपेक्षाच राहिली आहे. सध्या गावाच्या विहिरीतून डोक्यावरून घरात पाणी नेले जाते. चिखलप ग्रामपंचायत अंतर्गत चिखलप, हुनरवेल, शिरवणे, पुनिर आणि आदिवासी वाडी आशा गाववाड्यांचा समावेश आहे. शिरवणे गावात साधारणपणे सातशे लोकसंख्या आहे. योजना राबवूनदेखील घराघरात पाणी येत नसल्याने भरउन्हात तहान कशी भागणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

हर घर जल नाहीच
शिरवणे गावासाठी नळाद्वारे पाणी येत नाही याचे कारण वीज बिल थकीत असल्याचे कळले. मात्र, नुकतीच जलजीवन मिशनद्वारे पूर्ण झालेल्या योजनेद्वारे घराघरात पाणी मिळत नसल्याचे येथील महिलांनी सांगितले. हर घर जल असे योजनेचे घोषवाक्य असलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे दिसते.

नागलोली येथील जलजीवन योजनेसाठी आठ किलोमीटर अंतरात पाईपलाईन जोडण्यात आली. मात्र, नेटवर्कसाठी केबल टाकताना अनेक ठिकाणी पाईपलाईनला धक्का लागला आहे. त्यामुळे रोज गळती होत असल्याने पाणीपुरवठा होत नाही.

मीलन काते, उपसरपंच नागलोली

शिरवणे गावाच्या नळजोडणीच्या पंपाचे वीजबिल थकीत असल्याचे काही प्रकरण आहे. मात्र, याबाबत नक्की माहिती घ्यावी लागेल.

युवराज गांगुर्डे, उपविभागीय अभियंता, म्हसळा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
Exit mobile version