बदलत्या राजकीय परिस्थितीतही आ.जयंत पाटील शेकापशी एकनिष्ठ

ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांचे प्रशंसोद्गार

| अलिबाग | प्रतिनिधी |

राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेली वर्षभर राजकिय स्थित्यंतरे बघायला मिळत आहे, अशा बदलत्या परिस्थितीतही आ. जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत, असे प्रशंसोद्गार ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी काढले.अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे व ॲड. संतोष म्हात्रे यांच्या नुतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ बुधवार (दि.6) अलिबागमधील कामत आळी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, रघुजीराजे आंग्रे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रदिप नाईक, ॲड. गौतम पाटील, वृषाली ठोसर, संजना किर, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, शैला पाटील, ॲड. प्रवीण ठाकूर, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, विद्यमान सरपंच निखील मयेकर, हर्षदा मयेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष म्हात्रे यांच्या मातोश्री व मानसी म्हात्रे यांच्या सासू सुलभा म्हात्रे व मानसी म्हात्रे यांचे वडील धर्मा घरत यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, संतोष म्हात्रे व मानसी म्हात्रे यांचा परिचय गेल्या 15 ते 20 वर्षापुर्वी झाला. एका खटल्याच्या निमित्ताने अलिबागमध्ये आलो असता ॲड. दत्ता पाटील यांच्यासोबत ओळख झाली. ते एक आक्रमक वकील होते. तोच आक्रमकपणा मानसी म्हात्रे यांच्याकडे आल्याचे प्रकर्षाने जाणवते. आपल्या वकीली क्षेत्रात एक चांगली कामगिरी संतोष म्हात्रे व मानसी म्हात्रे या दांम्पत्यानी केली आहे. सुसज्ज असे नुतन कार्यालय त्यांनी उभारले असल्याचे सांगत त्यांनी आ. जयंत पाटील यांच्याबद्दल काही किस्से सांगितले. ते म्हणाले की, आ. जयंत पाटील यांची प्रशासनावर एक वेगळी पक्कड असल्याचे दिसून आले आहे. राज्यात, देशात, सत्ता बदल होत असताना मात्र शेतकरी कामगार पक्षाची सत्ता बदलली नाही, असे सांगून त्यांनी आ. जयंत पाटील यांचे कौतूक केले.

ॲड. मानसी म्हात्रे एक यशस्वी वकील
उरण खारेपाटातील मुलगी अलिबागमध्ये येते आणि यशस्वी वकील होते ही अभिमानाची गोष्ट आहे. दत्ता पाटील यांनी अनेक वकील तयार केले. त्यामध्ये ॲड. मानसी म्हात्रे यांनी अलिबागचे नाव उंचावले. ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम हे राज्यात, देशात एक वेगळ्या उंचीवर काम करणारे वकील आहेत. सुस्पष्ट व सर्वसामान्यांची जाण असणारे आणि शासन स्तरावर प्रभावी काम करणारे वकील आहेत.

स्व.नारायण नागू पाटील तसेच प्रभाकर पाटील यांनी उरणच्या खारेपाटात शिक्षणाचे महाद्वार खुले केले. वडिलांना शिक्षणाचे महत्व पटविल्यामुळे वडिलांनी शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळेच आज वकिली क्षेत्रात सर्वसामान्यांसाठी काम करणे शक्य झाले आहे. पाटील कुटूंबियांचे ॠण कधीही न फिटणारे आहेत. ॲड. दत्ता पाटील यांच्याकडून वकिली क्षेत्राचे शिक्षण घेतले. त्यांची शिकवण कायम लक्षात ठेवली. बदलत्या काळानूसार व्यवसाय करण्याची पद्धत बदलली असली तरी भविष्यात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम लढा देईन.

ॲड.मानसी म्हात्रे

Exit mobile version