रविवारीदेखील जंजिर्‍यात वर्दळ कायम

मुरूड समुद्र किनार्‍यावर पर्यटकांची दिवाळी
| मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |
सलग जोडून सुट्टी आल्याने रायगडच्या समुद्र किनार्‍यावर मोठ्या संख्येने पर्यटक येणार हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. सुमारे 50 ते 75 हजार पर्यटक हाजारो वाहनांतून रायगडच्या किनार्‍यावर शुक्रवारपासून दाखल झाले असून, रविवारदेखील दुपारपर्यंत ही पर्यटकांची वर्दळ कायम होती. रायगडातील पर्यटन स्पॉटमध्ये मुरुडचा जंजिरा जलदुर्ग पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून, गेल्या तीन दिवसात राजपुरी, खोरा, दिघी आदी जेटीवरून 15 हजार पर्यटकांनी जंजिरा आतून आणि बाहेरून पाहिला. यावेळी मुरूड तालुका पर्यटनात अव्वल ठरला असून काशीद, नांदगाव, मुरूड बीचवर 20 ते 25 हजार पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती तालुक्यात फिरताना ऐकायला मिळत होती. सुरक्षित समजल्या जाणार्‍या मुरूड किनार्‍यावरील समुद्रात शनिवार आणि रविवारी समुद्रात मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला. काशीद किनार्‍यावरदेखील शेकडोंच्या संख्येने पर्यटक पोहताना दिसत होते. दोन्ही किनार्‍यांवर वॉटर करमणुकीची साधने असल्याने पर्यटक जलक्रीडेसाठी स्वार होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करताना दिसत होते. खूप दिवसांनी हॉटेलिंग, छोटे उद्योग, लॉजिंग आदी उद्योगांना उर्जितावस्था आल्याचे दिसून आले. रविवारी सकाळपासून पर्यटकांच्या वाहनांची जंजिर्‍याकडे जाण्यासाठी रांग लागली होती. त्यामुळे मुरुडमधील मासळी मार्केटमार्गे राजपुरी कडे वाहनांची अक्षरशः प्रचंड कोंडी होत होती. यावर अद्याप प्रशासनाने उपाययोजना केली नसल्याने पर्यटकांनी संताप व्यक्त केला. शनिवारी संध्याकाळपासून मुरूड समुद्रकिनार्‍यावर वाहने पार्किंग करून पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले दिसत होते. रात्री किनार्‍यावर पर्यटकांनी फटाके फोडून आणि आतषबाजी करून दिवाळी, भाऊबीज सणाचा आनंद व्यक्त केला. रविवारी दुपारीदेखील मुरूड किनार्‍यावरील समुद्रात मोठ्या संख्येने पर्यटक जलक्रीडा आणि पोहताना दिसत होते. भविष्यात श्रीवर्धन, मुरूड तालुक्यातील पर्यटन स्थळे ही मोठ्या विकासाची नांदी ठरणार यात शंका नाही.

पर्यटकांसाठी लवकरच बोटीची सुविधा
पुढील वर्षात मुंबईपासून दिघी, मुरूड, काशीद, श्रीवर्धनपर्यंत अलिबाग ते भाऊच्या धक्क्याप्रमाणे जलद वेगवान बोटीची सुविधा उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या भागात प्रथम दर्जाचे पर्यटक येतील आणि प्रसिद्धी अटकेपार जाईल, हे निश्‍चित. वाहने आणि सुमारे 300 पर्यटक जलमार्गाने येथे आणण्याची क्षमता या वेगवान बोटीची असेल, अशी माहिती आहे. मात्र, जेट्टी आणि सर्व सुविधांची पूर्तता होईपर्यंत थोडासा धीर धरावा लागेल, हे मात्र निश्‍चितच!

Exit mobile version