समुद्रकिनारे फुलले, पर्यटन व्यावसायाला सुगीचे दिवस
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड, नांदगाव आणि काशिद समुद्र किनार्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून शनिवारी व रविवारी तर किनार्यावर महाजत्रेचे स्वरूप आल्याचेद दिसून येत होते. दरम्यान मुरूड मधील हिरा रेसिडेंसी या गेस्ट हाऊसचे मालक महेंद्र पाटील शनिवारी सायंकाळी म्हणाले की मुरूड मधील सर्व निवास व्यवस्था फुल्ल आहे.पर्यटनाचा सिझन खर्या अर्थाने सुरु झाला असून पूर्ण डिसेंबर महिना फुल्ल जाईल असे मत महेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. जंजिरा जलदुर्ग देखील पर्यटकांनी फुलून गेला आहे. मुरूड, काशीद, नांदगाव समुद्र किनारी मार्गावर शेकडो वाहने दिसत असून युवा पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. शनिवारी ठिकठिकाणी समुद्रात जलक्रीडेचा आनंद लुटला. काशीद, मुरूड बिचवरील स्टॉल्स ना देखील सुगीचे दिवस आलेले दिसून येत आहेत. काशीद समुद्र बीच देखील पर्यटकांनी फुलून गेल्याची माहिती काशीद येथील सुर्यकांत जंगम यांनी दिली. गेल्या 10 ते 15 दिवसात पर्यटकांचा सर्व प्रकारातील अत्यंत मोठा समुदाय मुरूड तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वळल्याचे दिसून येत असून जंजिर्यात जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसत आहे. जंजिरा केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अखत्यारीत असून दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असतो. मुरूड मध्ये समुद्र किनारी मोफत चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था असून शनिवारी देखील वाहनांना उत्तमरित्या पार्किंग करता आल्याने पर्यटक निर्धास्त असल्याचे दिसत होते.
मुरुडलाच पर्यटकांची जास्त पसंती
मुरूड तालुक्यातील सर्व स्थळे निसर्गदत्त असून सर्व स्थरातील पर्यटकांना भावतात असे दिवसागणिक दिसून येऊ लागले आहे. मुळात मुरूड तालुका एक ऐतिहासिक तालुका असून जंजिरा संस्थानची राजधानी होती. नांदगाव येथील श्री सिद्धिविनायक देवस्थान, मुरूडचे श्री दत्त देवस्थान, मुस्लिम बांधवांचा नबाब कालीन ईदगाह, मुरूड मधील काटकोनातील रस्ते, विजेशिवाय चालणारी 140 वर्षांपासुनची गारम्बी ड्रिंकिंग पाणी योजना, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 1912 साली मुरूडमध्ये बांधण्यात आलेली दोन रुग्णालये अशी स्थळे पाहण्यासारखी आहेत. तसेच प्रदूषणमुक्त हवामान हे आणखी एक वैशिष्ट्य देखील आहे.