। कोलंबो । वृत्तसंस्था ।
आशिया चषक 2023 मध्ये सध्या सर्वात मोठी चिंतेची बाब ठरला आहे तो म्हणजे श्रीलंकेतील पाऊस. पावसाने तर आशिया चषकामध्ये भारताची पाठ काही सोडलेली नाही. आशिया चषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये इंद्रदेवाने मुसळधार पाऊस पाडला आहे. 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सुपर फोर सामन्यात भारताच्या डावात मुसळधार पाऊस पडला. पावसाचा जोर इतका होता की रविवारी सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही.
आशियाई क्रिकेट परिषदेने या मोठ्या सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवला आहे. 11सप्टेंबर रोजी राखीव दिवशी सामना काल जिथे सोडला होता तिथून सुरू होईल (भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या). पण आता प्रश्न पडतो की, आज कोलंबोमध्ये हवामान कसे आहे? आजही सामना पूर्ण होईल की नाही?
आज कोलंबोमध्ये हवामान कसे असेल? ११ सप्टेंबरला सोमवारीही कोलंबोच्या हवामानात कोणताही बदल होणार नाही. 50 षटके सोडा, सामना पूर्ण करणेही हवामान पाहता शक्य वाटत नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमाल तापमान 30 अंशांवर जाणार असून पावसाची शक्यता 97 टक्क्यांपर्यंत आहे. दुपारी अंदाजे 17.9 मिमी पाऊस अपेक्षित आहे. आकाशात ढगांचे आच्छादन 100 टक्के राहील.