मुदत संपली तरी रस्ते अपूर्णच!

कोल्हारे ग्रा.पं.मधील तीन रस्त्यांच्या कामांबाबत ठेकेदार उदासीन

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ संकुल विकास प्राधिकरणकडून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत तीन रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. या रस्त्यांची कामे करण्यासाठी कामाचे कार्यादेश रायगड जिल्हा परिषदेकडून ऑगस्ट 2023 मध्ये देण्यात आले होते. मात्र, मुदत संपली तरी ती सर्व कामे अर्धवट आहेत. दरम्यान, नेरळ संकुल विकास प्राधिकरणकडून संबंधित ठेकेदार यांना पत्र देऊन सूचित करण्यात आल्यानंतरदेखील ठेकेदार कोणत्याही प्रकारे कामे सुरू करून पूर्ण करीत नाही. त्यामुळे रस्त्याची कामे मिळविणाऱ्या ठेकेदारावर जिल्हा परिषदेने कारवाई करावी आणि नवीन ठेकेदाराला ती कामे देण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी केली आहे.

कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये नेरळ बोपेले रस्त्यापासून हजारे नगर रस्ता तयार करण्यासाठी 23 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तर सिद्धिविनायक अपार्टमेंट ते कृष्णा पार्क या रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी 18 लाखांचा निधी मंजूर आहे. तसेच बोपेले-नेरळ- कळंब रस्ता ते अनश रेसिडेन्सी येथील रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या कामासाठी नेरळ विकास प्राधिकरणकडून 17.95 लाख निधी मंजूर आहे. या तिन्ही विकासकामांचा ठेका फायरविन इन्फ्राकोन सर्व्हिसेस या कंपनीने मिळविला आहे. काम करण्याचे कार्यादेश ऑगस्ट 2023 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. या रस्त्यांच्या कामांमध्ये मार्च 2024 पूर्वी बोपेले भागातील तिन्ही रस्त्यांची कामे होऊन तेथील रहिवाशी यांना पक्क्या रस्त्याने ये-जा करता आली असती. मात्र, ही सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये रस्त्याची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना आज एप्रिल 2024 मध्येदेखील रस्त्यांच्या कामासाठी केवळ सिमेंट पाईप आणून टाकण्यात आले आहेत. त्याशिवाय अन्य कोणतीही कामे ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नेरळ प्राधिकरणने रस्ता खोदणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशीदेखील मागणी केली आहे. त्याचवेळी प्राधिकरणने त्या भागातील रहिवाशांची गैरसोय आठ दिवसांत दूर केली नाही तर मात्र आपण स्वतः नवव्या दिवशी रस्त्याचं सपाटीकरण करून रस्ता सुस्थितीत करणार, असा इशारा दिला आहे.

Exit mobile version