नेरळ प्राधिकरण रस्ते कधी करणार? व्यावसायिक, ग्रामस्थांकडून विचारणा
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद आणि नगररचना विभाग यांच्या माध्यमातून नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी नेरळ विकास संकुल प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. या संकुलातील सार्वधिक क्षेत्र असलेल्या ममदापूर येथील नागरी वस्ती वाढत असलेल्या ठिकाणी सर्व रस्ते मातीचे बनले आहेत. त्यामुळे येथील विकासाला हे मातीचे रस्ते अडथळे ठरत आहेत, असा सूर बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थांमधून निघत आहे.
दरम्यान, सात वर्षांपूर्वी ममदापूर नवीन वसाहत भागातील रस्त्यांचे डांबरीकरण नेरळ विकास प्राधिकरणकडून करण्यात आले होते. दरम्यान, प्राधिकरणकडून ममदापूर भागात अनेक महत्त्वाच्या आणि मुख्य रस्त्यांवर काँक्रिटीकरण करण्यात येत नसल्याने येथील विकास थांबला आहे. नेरळ विकास संकुल प्राधिकरण यांची निर्मिती रायगड जिल्हा परिषद आणि शासनाच्या नगररचना विभाग यांनी केली आहे. नेरळ प्राधिकरणमध्ये नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात नेरळ आणि ममदापुर या दोन ग्रामपंचायतींमधील सर्व क्षेत्राचा, तर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील गावे वगळता अन्य भागाचा समावेश आहे. त्यात नियोजनबद्ध विकास होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये होत आहेत.
मात्र, त्यावर नेरळ प्राधिकरणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यातून कठीण समस्या नेरळ प्राधिकरणमधील ममदापूर ग्रामपंचायतीमधील रस्त्यांमुळे बनली आहे. त्या ठिकाणी प्राधिकरणचे सर्वाधिक क्षेत्र असूनदेखील प्राधिकरणकडून मुख्य रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे प्राधान्याने केली जात नाहीत. त्यात नेरळ खांडा येथून 100 मीटर लांबीचा रस्ता वगळता तेथून कॉलेज रस्ता काँकिटीकरणाची वाट पाहात आहे. त्या रस्त्यावर 50 मीटर अंतरावर काँक्रिटीकरण करण्यात आले असून, तेथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारांची कामे प्राधिकरणकडून अर्धवट ठेवण्यात आली आहेत. त्याचवेळी तेथे दोन एकर जमिनीमध्ये असलेले गार्डन विकसित करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने मोठा निधी दिला होता. मात्र, त्या निधीमधून त्या गार्डनमध्ये एकही झाडे लावलेले दिसत नाही. तर त्या गार्डनच्या बाजूने गावाकडे जाणारा रस्ता, नेरळकडे येणारा तसेच टेकडी ते ममदापुर गाव अशी अनेक रस्त्यांची कामे ममदापूरमध्ये झालेली नाहीत. यातील काही रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे तत्कालीन जि.प. अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या कार्यकाळात झाली आहेत.
ममदापुर गावातील नवीन वसाहत भागातील रस्त्यावर डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण यापैकी काहीही केले जात नाही. त्यामुळे या भागातील रस्त्यावर धुळीचे लोट कोणत्याही प्रकारचे वाहन गेल्यावर आकाशात उडत आहेत. तसेच रस्त्यावर पडलेल्या अगणित खड्ड्यांमुळे बांधकाम व्यावसायिकदेखील संकटात आले आहेत. त्यांची अर्ध्याहून अधिक घरे विक्री न झाल्याने तशीच आहेत. बांधकाम व्यवसायिक आणि स्थानिक ग्रामस्थ तेथील रस्त्यावरील धुळीमुळे संकटात सापडले आहेत.