| नागपूर | प्रतिनिधी |
विदर्भातील पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. नागपुरात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना होत असला तरी भाजपचे मतदान केंद्र नियोजन मजबूत असल्याचे स्पष्ट झाले. गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्हा असला तरी त्याचा मतदानावर परिणाम झाला नाही. भंडारा-गोंदिया, रामटेक आणि चंद्रपूर येथे महायुती व महाविकास आघाडीत जोरदार लढत झाल्याने निकाल नक्की कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येणार नाही.
महाराष्ट्रातील नागपुरातील लढतीकडे देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. सकाळीच पुरूष, पहिल्यांदा मतदान करणारे युवक बाहेर पडले. दुपारी महिला मतदानासाठी बाहेर पडल्या. रामटेकमध्ये शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस तळ ठोकून होते. खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कापत काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेत शिवसेनेची उमेदवारी दिली.
पण, सक्षम उमेदवार न सापडल्याने बाहेरून उमेदवार आणला आणि उभा केला. त्यातही तुमानेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी होतीच. मतदारसंघात बौद्ध समाजाचे साडेसहा लाखांच्या आसपास मतदान आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व काँग्रेस यांच्यात लढत रंगल्याने नक्की कोण विजयी होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.