प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा- किशन जावळे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदान 20 नोव्हेंबरला दोन हजार 790 केंद्रांमध्ये होणार आहे. 24 लाख 88 हजार 788 मतदार मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 20 हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचार्‍यांचा सहभाग असणार आहे. त्यामध्ये पोलीस होमगार्ड, एनसीसी जवान, एनएसस व इतर सुरक्षा यंत्रणेचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांनी न विसरता मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले.

मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात सोमवारी (दि. 18) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, आचारसंहितेचा भंग करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात 50 हून अधिक कारवाई करण्यात आली असून, नऊ गुन्हे दाखल केले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार्‍यांवरही लक्ष ठेवण्यात आले. त्यामध्ये 48 लाख 46 हजारांची रोकड जप्त केली आहे. एक कोटी 67 लाखांची दारु, सहा कोटी 97 लाख रुपयांचे अमली पदार्थ, इतर असा एकूण 27 कोटी 43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचनंतर प्रचार थांबला आहे. मतदान वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत केंद्रावर होणार आहे. मतदान केंद्रामध्ये लागणारे साहित्य, साधनसामुग्री पुरवण्यात आल्या असून, मंगळवारी 19 नोव्हेंबरला कर्मचारी केंद्रावर रवाना होणार आहेत.

महिलांना जवळचेच केंद्र देणार
मतदान केंद्रामध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये. यासाठी त्यांना जवळचे केंद्र देण्याची सूचना उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जावळे यांनी दिली.
346 एसटी बसेसचा होणार वापर
कर्मचारी व साहित्यांची ने-आण करण्यासाठी दोन हजार 800 वाहनांची व्यवस्था असणार आहे. त्यामध्ये 346 एसटी बसेस, 124 मिनी बस आणि जिपचा समावेश आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या केंद्रावर वेळेत पोहोचता यावे यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी एसटी बसेसचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक फेर्‍या रद्द होण्याची शक्यता आहे. त्याचा त्रास नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना होणार आहे.
49 केंद्रांवर सेटेलाईटचा वापर
रायगड जिल्ह्यातील 49 केंद्रांवर इंटरनेट व इतर सुविधांचा अभाव आहे. मोबाईल फोन लागणार नाहीत. त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांशी संवाद साधण्यासाठी वॉकीटॉकी, पोलीस वायरलेस आणि सॅटेलाईटचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भयमुक्त वातावरणात मतदान करा
जिल्ह्यातील मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात येणार आहे. तीन हजारांहून अधिक सुरक्षा यंत्रणा असणार आहे. त्यात एक हजार 859हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी, दीड हजारांहून अधिक होमगार्ड, 570हून अधिक वन संरक्षक, एनसीसी, एनएसएस, एसआरपी शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.
Exit mobile version