रायगडात 4 हजार 156 दुबार मतदार
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांचा समावेश आहे. नगरपरिषदांमधील 217 सदस्य तर 10 थेट नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 2 लाख 37 हजार 503 मतदार आहेत. त्यात 4 हजार 156 दुबार मतदार आहेत. या दुबार मतदारांवर निवडणूक यंत्रणेची करडी नजर असणार आहे. या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार लावण्यात आले आहेत. या मतदारांना मतदानासाठी प्रभाग निवडायची संधी देण्यात येणार आहे. थेट मतदान केंद्रावर येणाऱ्या दुबार नाव असलेल्या मतदारांकडून मतदान एकाच ठिकाणी केल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर केल्याने नगरपरिषद क्षेत्रात आणि शहराच्या लागत असणाऱ्या ग्रामीण भागात आचारसंहिता जाहीर झाली आहे. नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या हद्दीतील मतदारांवर प्रभाव पडेल, असे कार्यक्रम जिल्ह्यात इतरत्र घेता येणार नाही. तसे झाल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात असणाऱ्या 10 नगर परिषदांमध्ये केलेल्या मतदार याद्यांच्या तपासणीमध्ये तब्बल 4 हजार 156 दुबार मतदार आढळून आले आहेत. यामध्ये खोपोली नगरपरिषदेमध्ये सर्वाधिक 891 दुबार मतदार आढळले आहेत. त्याखालोखाल कर्जत नगरपरिषद 817, पेण नगरपरिषद 784, उरण नगरपरिषद 781, महाड नगरपरिषद 359, अलिबाग नगरपरिषद 244, श्रीवर्धन नगरपरिषद 131, मुरूड जंजिरा नगरपरिषद 69, रोहा नगरपरिषद 62 आणि माथेरान नगरपरिषदेमध्ये 18 दुबार मतदारांची नावे आढळली आहेत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
नगरपरिषद हद्दीमध्ये आढळलेल्या प्रत्येक दुबार मतदारांच्या घरी नगरपरिषदांचे अधिकारी-कर्मचारी जाणार आहेत. त्यांना नेमके कोणत्या प्रभागात किंवा नगरपरिषदेसाठी मतदान करायचे आहे, हे त्यांच्याकडून लिखित घेतले जाणार आहे. थेट मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी दुबार मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यावर त्यांच्या कडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. नगर परिषदमधील प्रत्येक मतदाराला त्यांच्या द्विसदस्यीय प्रभागातील दोन उमेदवारांना प्रत्येक मत द्यायचे आहे. तर यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने त्या उमेदवारालाही मतदारास तिसरे मत द्यावे लागणार आहे.
रायगड जिल्ह्यातील 10 नगर परिषदांमधील निवडणुकीसाठी 107 प्रभाग असणार आहेत. यामध्ये खोपोली सर्वात मोठी नगरपरिषद असून या नगरपरिषदेमध्ये 15 प्रभाग, पेण नगरपरिषद 12 प्रभाग, अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड जंजिरा, रोहा, महाड, उरण, कर्जत आणि माथेरान या नगरपरिषदांमध्ये 10 प्रभाग असणार आहेत. जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये 217 नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. यामध्ये खोपोली नगरपरिषदेमध्ये 31, पेण 24, उरण 21, कर्जत 21, अलिबाग, श्रीवर्धन 20, मुरूड जंजिरा 20, रोहा 20, महाड 20 आणि माथेरान नगरपरिषदेमध्ये 20 नगरसेवक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडण्यात येणार आहेत.
दहा नगरपरिषदांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये 2 लाख 37 हजार 503 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये खोपोली, 62 हजार 74, अलिबाग 16हजार 354, श्रीवर्धन 12 हजार 637, मुरूड जंजिरा 11 हजार 544, रोहा 17 हजार 669, महाड 23 हजार 124, पेण 33 हजार 875, उरण 26 हजार 214, कर्जत 29 हजार 957 आणि माथेरान नगर परिषदेमध्ये 4 हजार 55 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक खर्चात वाढ
मतदानास जाताना मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यासंबंधीचा निर्णय आवश्यकतेनुसार तेथील मतदान अधिकारी घेतील. दुसरीकडे उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही वाढ करण्यात आली आहे. अ वर्गाच्या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारास 15 लाख तर सदस्यांसाठी नऊ लाख, ब वर्गाच्या नगरपरिषदांमधील अध्यक्षपदाच्या उमेदवारास 11 लाख 25 हजारांचा आणि सदस्यांसाठी साडेतीन लाखांपर्यंत मर्यादा आहे. क वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये तर सदस्याच्या उमेदवारांना अडीच लाखांचा खर्च करता येणार आहे.





