सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रेय
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील वढाव-खानाव येथील पुल (साकव) सोमवारी सायंकाळी कोसळला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एसटी बस सेवासह इतर सेवेवर त्याचा परिणाम झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने युध्दपातळीवर या पुलाचे काम केले. अखेर हे काम 30 तासानंतर पुर्ण झाले असून गुरुवारपासून हा पूल वाहतूकीस खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
अलिबाग-रोहा मार्गावरील वढाव येथील पुल सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. अचानक पुल कोसळल्याने रोहा व अलिबाग मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाल्यावर मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाची पाहणी करीत सर्व माहिती घेतली. वाहतूकीसाठी महत्वाचा असलेल्या पुलाची दूरूस्ती करण्याची कामगिरी युध्दपातळीवर सुरु करण्यात आली. क्रेनच्या मदतीने पुलावरील कोसळलेला भाग काढण्यात आला. तो परिसर स्वच्छ करून त्याठिकाणी मोठे पाईप टाकण्यात आले. माती खडी टाकण्यात आली. मंगळवारी सायंकाळी सुरु झालेल्या कामाला गती मिळाली. बुधवारी सायंकाळपर्यंत हे काम अंतिम टप्प्यापर्यंत सुरु होते. गुरुवारपासून वाहतूकीस पुल खुला केला जाणार असल्याची माहिती मोनिका धायतडक यांनी दिली. अवघ्या काही तासात पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. त्यामुळे कोणतीही अवजड वाहने या पुलावरून घेऊन जाऊ नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी दिली.







