सगळ्यांनाच लागली निकालाची उत्सुकता

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणुक मंगळवारी (दि.7) पार पडली. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. मतदान झाल्यानंतर आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ती निकालाची. हा दिवस उजाडायला अजून जवळपास महिना बाकी असल्याने सर्वांनाच मतं मोजणीची उत्सुकता लागली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या दैनंदिन कामाकडे लक्ष दिले आहे. तर, काहींनी आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. नाक्या नाक्यावर मतांची आकडेमोड करीत आहेत. मतदान प्रक्रिया पार पडली आणी कार्यकर्ते आता या प्रभागात आपली ताकत त्या प्रभागात आपली ताकत, असे दावे करीत आहेत. आपलाच खासदार होणार असा दावा महायुती आणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करीत आहेत. कार्यकर्ते जसे आकडे मोड करीत आहेत तशीच आकडेमोड नेते मंडळी देखील करताना दिसत आहेत.

रायगड जिल्ह्यात सरासरी 60.51 टक्के मतदान झाले. येथे महाविकास आघाडीचे अनंत गीते व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांची चुरशीची लढत आहे. त्यांच्या राजकीय प्रतिष्ठा व अस्तित्वाची ही निवडणूक असल्याने या निकालाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. एकूणच प्रचाराचा धुरळा खाली बसला आहे. आणि आता विजयाचा गुलाल उधळण्याची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

निवडणूकीची मदार कार्यकर्त्यांवर असते. त्यामुळेच प्रत्येक नेता कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करतो. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून उमेदवारांनी व पदाधिकार्‍यांनी प्रचाराचे नियोजन केले होते. त्यामध्ये कार्यकर्त्यांना अग्रस्थान होते प्रचार फेर्‍या, बैठका, पत्रके वाटणे, मतदारांच्या गाठीभेटी घेणे, छुपा प्रचार करणे या कामांत कार्यकर्ते व्यग्र होते. प्रमुख कार्यकर्त्यांची तर दमछाक झाली. त्यामुळे मतदान झाल्यानंतर त्यांनी निश्‍वास टाकला आहे. आता त्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. काही कार्यकर्ते पार्टी कार्यालयात जमत आहेत ते आपल्या उमेदवाराला किती मते मिळणार याचा अंदाज घेण्यासाठी आकडेमोड करीत आहेत.

प्रचारासाठी मेहनत घेतली. आम्ही अहोरात्र प्रचार केला आहे. खूप प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे. खूपच दमछाक झाली असली तरी थकवा जाणवत नाही. आता निकालाची प्रतीक्षा आहे. आमच्या उमेदवार जिंकण्याचा विश्‍वास वाटतो. निकालाची उत्सुकता कायम आहे.

अमित गायकवाड,
रायगड जिल्हा युवक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

आमच्या उमेदवाराची विश्‍वासहार्यता व अनेक वर्ष केलेली विकासाची कामे यामुळे विजयाची खात्री आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन मेहनत घेतली आहे. आमच्या कष्टाचे नक्कीच चीज होईल, आता प्रतीक्षा निकालाची आहे.

रोहन राऊत,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, उपशहर प्रमुख, पाली,
Exit mobile version