कार्यकर्ते रमले आकड्यांच्या खेळात

उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या जीवाची घालमेल; सगळ्यांनाच लागली निकालाची उत्सुकता

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी बुधवारी (ता. 20) संपली. मात्र, मतदान झाल्यानंतर आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ती निकालाची. आपलाच उमेदवार कसा निवडून येणार याबाबत सोशल मीडिया व नाक्या-नाक्यावर चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर वाक्युद्ध सुरु झालेले दिसत आहे.
निकालाचा दिवस उजाडायला अजून एक दिवस बाकी असल्याने काही कार्यकर्त्यांनी आपल्या दैनंदिन कामाकडे लक्ष दिले आहे. तर, काहींनी आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, अनेकजण नाक्यावर बसून मतांची आकडेमोड करीत आहेत.

रायगड जिल्ह्यात सरासरी 68.80 टक्के मतदान झाले. सातही मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. अनेक उमेदवारांच्या राजकीय प्रतिष्ठा व अस्तित्वाची ही निवडणूक असल्याने दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ठरविणार्‍या या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. एकूणच, प्रचाराचा धुरळा खाली बसला आहे. आणि, आता विजयाचा गुलाल उधळण्याची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली. निवडणुकीची मदार कार्यकर्त्यांवर असते, त्यामुळेच प्रत्येक नेता कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करतो. विधानसभा निवडणुकीत इतर कार्यकर्त्यांच्या उमेदवारांची पानं हलत नाही.

निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून उमेदवारांनी व पदाधिकार्‍यांनी प्रचाराचे नियोजन केले आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांना अग्रस्थान होते प्रचार फेर्‍या, बैठका, पत्रके वाटणे, मतदारांच्या गाठीभेटी घेणे, छुपा प्रचार करणे या कामांत कार्यकर्ते व्यग्र होते. प्रमुख कार्यकर्त्यांची तर दमछाक झाली. त्यामुळे मतदान झाल्यानंतर त्यांनी निःश्‍वास टाकला आहे. आता त्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. काही कार्यकर्ते पार्टी कार्यालयात जमत आहेत, ते आपल्या उमेदवाराला किती मते मिळणार याचा अंदाज घेण्यासाठी आकडेमोड करीत आहेत. काहींनी एक-दोन दिवस आराम करण्याचा निर्धार केला आहे. तर काही जण आपल्या कामाकडे व कुटुंबाकडे लक्ष पुरविणार आहेत. निखिल खैरे या कार्यकर्त्याने सांगितले की, गेल्या महिनाभर प्रचारासाठी फिरत होतो. त्यामुळे जरा थकलो आहे, मात्र अजूनही आराम नाही. सध्या आमच्या उमेदवाराच्या निकालाची उत्सुकता आहे. आमचा उमेदवार निवडून येणार याची खात्री आहे. एकूणच काय, तर निकलानंतरच सर्वजण सुटकेचा निःश्‍वास सोडणार हे नक्की.

हॉटेल व ढाब्यावर गर्दी
निवडणूक मतदान प्रक्रिया संपल्यावर बहुतांश कार्यकर्त्यांनी रात्री हॉटेल व ढाब्यावर गर्दी केली होती. महामार्गांवरील हॉटेल व ढाबे रात्री फुल्ल होते. शिवाय, गाव-खेड्यातील छोटी-मोठी हॉटेल्सदेखील कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरली होती. यामुळे हॉटेल व ढाबेवाल्यांचा धंदा चांगला झाला. परतीचे मतदारदेखील काही प्रमाणात येथे थांबले होते.

आमच्या पक्षाला व उमेदवाराला चांगले मतदान झाले आहे. नेत्यांचे योग्य मार्गदर्शन व व्यूहरचना आणि सर्वांनी केलेले नियोजन बद्ध काम यामुळे यशाची खात्री आहे. कार्यकर्त्यांनी मन लावून मोठा प्रचार केला असल्याने यश हमखास मिळणार त्यामुळे आता निर्धास्त आहोत. फक्त निकालाची उत्सुकता आहे.

विद्देश आचार्य,
शिवसेना (उबाठा) पाली शहर प्रमुख

सोशल मीडियावर मतदार संघात कोण जिंकणार व कोणाला किती मत मिळतील याचा अंदाज मांडला आहे. कुठे कोणता उमेदवार वरचढ आहे. कुठे कोणाला फटका बसेल याचा एकूण आढावा घेतला आहे.

निलेश शिर्के,
नागरिक, पाली

Exit mobile version