माजी नगरसेविकेच्या पतीला दंड

| पालघर | प्रतिनिधी |

विरार येथील जागेत अनधिकृत माती भराव केल्याप्रकरणी जागा मालक विनोद सुदाम पाटील यांना वसई तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी तब्बल 1 कोटी 38 लाख 65 हजार 60 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 26 जुलै रोजी या संदर्भातील नोटीस बजावण्यात आली असून, सात दिवसांत ही रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा; 8 अ प्रमाणे इतर त्यांच्या सर्व मिळकतींवर बोजा नोंदविण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी या आदेशात म्हटले आहे. विनोद सुदाम पाटील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका हेमांगी पाटील यांचे पती आहेत.

विरार येथील मिळकतीच्या जागेत 13 जुलै 2023 मध्ये विनोद सुदाम पाटील यांनी माती व डेब्रिजने गाळ भराव केल्याचे वसई-विरार महापालिकेने विरार तलाठ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. विनोद पाटील यांनी सादर केलेल्या खुलाशात आपल्या जमिनीशेजारी नैसर्गिक पाणी वाहून नेणारा नाला असल्याचे सांगितले होते. नालेसफाई दरम्यान वसई-विरार महापालिकेकडून दरवर्षी काढण्यात येत असलेला गाळ या जागेत टाकण्यात येत होता. ही जागा रिकामी असल्याने हा गाळ वर्षानुवर्षे साठलेला आहे. शिवाय आपल्याविरोधात कोणीतरी आकसापोटी अनधिकृत माती भराव केल्याची खोटी तक्रार केली असावी, अशी शक्यताही त्यांनी खुलाशात व्यक्त करत तलाठ्यांच्या अहवाल चुकीचा असल्याचे सांगत आक्षेप नोंदवला होता.

तलाठ्यांनी सादर केलेल्या अहवालात 500 ब्रास माती व 864 ब्रास डेब्रिज असा एकूण 1364 ब्रास माती व डेब्रिज भराव केलेला असल्याचे स्पष्ट नमूद आहे. शिवाय या उत्खननास सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी नसल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे हे उत्खनन अवैध ठरवून तहसीलदारांनी विनोद सुदाम पाटील यांचा खुलासा अमान्य केलेला होता. या जागेत अवैध माती भराव करून सरकारचे स्वामित्वधन 8 लाख 18 हजार 400 रुपये व त्यावरील पाच पट दंडनीय रक्कम 1 कोटी 30 लाख 46 हजार 660 अशी एकूण 1 कोटी 38 लाख 65 हजार 060 इतकी रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम सरकार खाती जमा न केल्यास त्यांच्या त्यांच्या सर्व मिळकतींवर बोजा नोंदवण्यात येणार आहे.

Exit mobile version