| पालघर | प्रतिनिधी |
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून प्रचंड वाहतूककोंडी सुरू असून, चौथ्या दिवशीही प्रवाशांना मोठे हाल सोसावे लागले. मुंबई मार्गिकेवर वसई हद्दीत वर्सोवा ब्रिज ते विरार फाट्यापर्यंत सुमारे 20 ते 25 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शाळेच्या 6 बस 9 तास एकाच जागी स्तब्ध झाल्या. यात विद्यार्थी, रुग्णवाहिका, वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे आता पालघर तुफान वाहतूककोंडीचे घर झाले आहे. या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांसह सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. मुंबईतील मालाड येथील मदर तेरेसा शाळेच्या सहलीसाठी आलेल्या सहा बसमधील जवळपास 300 विद्यार्थी पहाटे 3:30 वाजेपर्यंत तब्बल नऊ तास वाहतूककोंडीत अडकले होते. स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी तातडीने मदतीचा हात देत अडकलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना जेवणाची व्यवस्था केली. वाहतूककोंडीमुळे वसई-विरार शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही परिणाम होत आहे. विरार उड्डाणपूल, नारिंगी, चंदनसार, माणिकपूर, सातिवली, वालीव, वसई फाटा, तुळिंज, संतोष भुवन, औद्योगिक वसाहतीकडे जाणारे मार्ग यासह शहरातील अंतर्गत मार्गावर कोंडी होऊ लागली आहे. रस्ते मार्गाचा वापर करून प्रवासी हे ये-जा करत असतात, परंतु शहरातील नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.





