सुट्टीत समुद्रकिनारे फुलण्याची आशा; सेल्फी पॉईंटंचे विशेष आकर्षण
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
यावर्षी मे महिन्यात सुरू झालेला पावसाळा व नंतर देखील ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेला पावसाळा यामुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये काही प्रमाणात घट झाली होती. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणातही भरपूर पाऊस पडला. परंतु, कोकणात पूरजन्य परिस्थिती कोठेही जाणवली नाही. मात्र, पर्यटक तुरळक प्रमाणातच येत होते. दिवाळीला सुरुवात झालेली आहे. वसुबारस, धनतेरस व लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे तीन दिवस आपल्या घरी साजरे केल्यानंतर लक्ष्मीपूजन झाले की, बलिप्रतिपदेच्या दिवशी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी बाहेर पडतात.
मुलांच्या शाळांना देखील सुट्टी पडलेली असते. त्यामुळे पुढील पंधरा दिवस पर्यटकांचा हंगाम चांगल्या प्रमाणात राहील अशी आशा पर्यटन व्यवसायीकांमधून व्यक्त केली जात आहे. 22 ऑक्टोबरपासून श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलणार आहेत. श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती करण्यात आलेले सुशोभीकरण हे पर्यटकांचे खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. या ठिकाणी असलेली कोळंबीची प्रतिकृती, खेकड्याची प्रतिकृती त्याचप्रमाणे एक होडी व मच्छीमार जोडपे तसेच या ठिकाणी बनवण्यात आलेले सेल्फी पॉईंट पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.
श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर असलेला सुशोभीकरण केलेला धूप प्रतिबंधक बंधारा देखील पर्यटकांना फिरण्यासाठी अत्यंत चांगले ठिकाण झाले आहे. मात्र, यावर्षी लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून समुद्राकडे उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या व रॅम्प याचे काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे, नगरपरिषदेने त्या ठिकाणी असलेल्या पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी जोर धरत आहे. श्रीवर्धन शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणारा आरावी, कोंडविल समुद्रकिनारा देखील सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण बनले आहे.
व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज
या ठिकाणी असलेली चंदेरी रंगाची वाळू पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर हरिहरेश्वर, दिवेआगर व आदगाव हे समुद्रकिनारे ही पर्यटकांसाठी सध्या बघण्याचे ठिकाण झाले आहेत. सर्व पर्यटन व्यावसायिक येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत.







