नुकसान भरपाईसाठी माजी सरपंचाचे उपोषण

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हालिवली व किरवली या दोन्ही गावांमधून गेलेल्या कर्जत-पनवेल रेल्वे बोगद्याच्या कामामुळे गेली 2 वर्षे येथील ग्रामस्थ यातना भोगत आहेत. बोगदा ब्लास्टिंग कामामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी येथील माजी सरपंच प्रमिला बोराडे या 15 ऑगस्टपासून उपोषणला बसणार आहेत. याबाबतचे निवदेन त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना दिले.

याआधी दोन वेळा त्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला होता. मात्र त्यांना यश आले नाही. पनवेल कर्जत रेल्वे मार्गासाठी बांधण्यात येत असलेल्या बोगद्यासाठी सुरुंग स्फोट केले जात आहेत. मात्र त्यामुळे स्थानिक किरवली आणि हालिवली गावातील दोन्ही गावातील घरांचे नुकसान झाले आहे. तसेच तेथील बोअरवेलचे पाणी गायब झाले आहे. आदिवासी वाडी किरवली, बौद्धवाडी व परिसरातील घरांची झालेली आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल, तसेच गावातील अंतर्गत रस्ते तयार करून देण्यात यावे या मागणीसाठी हलवली ग्रामपंचायत माजी सरपंच प्रमिला बोराडे यांनी उपोषण केले होते. त्या दोन्ही उपोषणाच्या वेळी कर्जतचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र ती आश्वासने पूर्ण झाली नाहीत त्याचवेळी प्रशासन त्याबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य स्थानिकांना आणि नुकसान ग्रस्तांना करीत नाही. दरम्यान, बोराडे यांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे उपोषणाआधी प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कर्जत तहसीलदार यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांच्यावतीने लेखी आश्वासन देण्यात आले कि, दोन्ही गावच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, (प्रत्येकी सहा-सहा बोअरवेल अशा दोन्ही गावासाठी 12 बोअरवेल) मात्र, या सर्व आश्वासनांना कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांनी हरताळ फासले आहे. आमची घोर फसवणूक करून आमच्यावर अन्याय केला आहे. स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरु करणार.

प्रमिला बोराडे, माजी सरपंच
Exit mobile version