माजी सैनिक ते अट्टल गुन्हेगार; मयूरेश गंभीरचा घातकी प्रवास
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
खून, चोरी, फसवणूक, मारहाण, जबरदस्ती असे एक नाही तब्बल 12 गुन्हे केल्याची नोंद असलेला मयूरेश गंभीर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र यावेळी तो त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबरोबरच त्याच्यावर असलेल्या स्थानिक आमदारांच्या वरदहस्तामुळेसुद्धा. दोन दिवसांपूर्वीच दुसऱ्या पत्नीसह सासूचाही खून केल्याची कबूली त्यांनी पोलिसांना दिली. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकारणात शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्थानिक आमदारांचे गुन्हेगार मयूरेशसोबतचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. अशा समाजकंटकांसोबत आमदारांची उठबस असल्यामुळे महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नुकतेच खालापूरमधील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच त्यांच्याच गटातील आमदाराने अट्टल गुन्हेगाराला दिलेले पाठबळ कळीचा मुद्दा ठरला आहे. गंभीर गुन्हे केल्यानंतर मयूरेश गंभीर यास 2009 तसेच 2011 मध्ये हद्दपार करण्यात आले होते. समाजासाठी घातक वृत्ती असल्यामुळे त्यास तडीपार करण्याची मागणी त्यावेळी नागरिकांनी केली होती.
पोयनाड येथील मयूरेश गंभीर यास सचिन तावडे खूनप्रकरणी अलिबाग येथील प्रमुख सत्र न्यायालयाने जन्मेठेपेची शिक्षा सुनावली होती. या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील प्रमुख सत्र न्यायाधीश एम. एम. मोडक यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. जितेंद्र म्हात्रे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान 19 साक्षीदारांचे पुरावे नोंदवण्यात आले होते. अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याला मारणाऱ्या गुंड मयूरेश गंभीर याला तातडीने मोक्का कायद्याअंतर्गत अटक करा, अशी मागणीही त्यावेळी शेकाप आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत करुन सरकारचे लक्ष वेधले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या गुंडाने मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील ग्रामस्थांनी त्याच्या दादागिरीला भिक घातली नाही. मयूरेशने अनेकदा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम केले.
दोन दिवसांपूर्वी दिली गुन्ह्याची कबूली
मयुरेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो तडीपार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेत आरोपी मयुरेश याला मानपाडा खोणी डोंबिवली येथून अटक केले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या हत्येची कबुली दिली. तसेच आरोपीने मृत महिलेच्या मुलीची 11 महिन्यांपूर्वी हत्या केल्याचे सांगितले. मायलेकीच्या या धक्कादायक हत्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून माजी सैनिक असलेला मयुरेश हा गेल्या वर्षी खुनाच्या गुन्ह्यातुन निर्दोष सुटला होता. त्याला पुन्हा पत्नी व सासूच्या खुनप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
2007 पासून गुन्ह्यांची नोद
मयूरेश हा सैनिक म्हणून देशाच्या सीमेवर होता. त्यावेळी पदाचा तसेच हत्याराचा गैरवापर करीत त्याने पोयनाड येथील सचिन तावडे याचा खून केला. ही घटना 2007 मध्ये घडली. त्यानंतर न्यायालयाने त्यास शिक्षा सुनावली. मात्र सुधारण्याऐवजी तो अनेक गुन्हे करीत गेला. नोंद करण्यात आलेल्या 12 गुन्ह्यांपैकी 6 गुन्हे पोयनाड पोलीस ठाणे, 1 पनवेल, 2 अलिबाग, 1 मांडवा, 1 विक्रोळी, 1 पेण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. यापैकी 7 गुन्हे अद्यापही न्यायप्रविष्ठ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दोन वेळा तडीपार करण्याचा प्रस्ताव
गुंडगिरी करीत समाजात तेढ निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था बिघविल्यामुळे मयूरेशला दोन वेळा तडीपार करण्यात आले होते. याची नोंद पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राजकारणात सक्रिय
मयूरेशकडे शिंदे गटाचे जिल्हा संघटक हे पद होते. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत त्याची कायमच उठबस होती. अनेक गुन्ह्यांची पार्श्वभूमी असतानाही शिंदे गटाने अशा आरोपीला जिल्हा संघटक हे महत्वाचे पद का द्यावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेले जवळपास 14 वर्षे मयूरेश गुन्हेगारी जगात वावरत आहे. असे असताना आ. दळवींनी त्याला पाठिशी का घालावे? आज निष्पाप मायलेकींना मारुन त्याने माणूसकीला काळिमा फासण्याचे काम केले आहे. अशा घातक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवरही ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.