जलजीवन मिशनच्या कामांची चाैकशी करा; डिपीडीसीच्या बैठकीत आ.जयंत पाटील आक्रमक

अहवाल मागवण्याचे पालकमंत्र्यांनी दिले निर्देश 

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्याला  जलजीवन मिशन योजनेतून तब्बल एक हजार 200 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र एकाच ठेकेदाराला 50 ते 60 कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याने कामाचा दर्जा आणि निर्धारित वेळेत कामे पूर्ण होणार नाहीत. नागरिकांना पाण्यावाचून तडफडत ठेवायचे का, असा सवाल उपस्थित करत या सर्व प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली.

आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीला जिल्हा नियाेजन समितीच्या सर्व पक्षीय सदस्यांनी दुजोरा देत आमदार पाटील यांनी केलेली मागणी रास्त आणि थेट नागरिकांच्या प्रश्नाला हात घालणारी असल्याचे सांगितले. तालुका निहाय जलजीवन मिशनची किती कामे मंजूर झाली आहेत, किती पूर्ण झाली आणि एकाच ठेकेदाराला किती कामे देण्यात आली आहेत, याबाबतची माहिती  रायगड  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी  पुढील आठ दिवसांमध्ये सादर करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. अलिबाग येथील जिल्हा नियाेजन भवन मध्ये जिल्हा नियाेजन समितीची बैठक आज पार पडली. त्या बैठकीत आमदार जयंत पाटील नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत हाेते.

जलजीवन मिशनमध्ये केंद्र आणि राज्याचा निधी दिला जाताे. प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सदरची याेजना सुरु करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात या याेजनेबाबत नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी समाेर आल्या आहेत. काेट्यवधी रुपये खर्च करुन नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार नसेल तर हे फार गंभीर असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. या कामांची चाैकशी करण्याच्या मागणीला सभागृहातील खासदार, आमदार यांनी दुजाेरा दिला. त्यानुसार आता तालुकानिहाय या याेजनेची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी मागवली आहे. यातील त्रुटी दुर करुन नागरिकांपर्यंत याेजना पाेचली पाहीजे असेही आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार जयंत पाटील यांनी केलेली मागणी अतिशय रास्त आहे. त्यानुसार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात याबाबत बैठक बाेलवण्यात येणार असल्याचे, तसेच याेजनेची सर्व माहिती लाेकप्रतिनीधी यांना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Exit mobile version