खाकीचा आशीर्वाद असल्याची चर्चा
| पेण | प्रतिनिधी |
शासन पर्यावरणाचा ऱ्हास होतोय म्हणून करोडोंचा महसूल बुडवून वाळू उत्खननावर बंधने लादत आहे. परंतु, या शासनाच्या वाळू उत्खननाच्या बंधनामुळे सद्यःस्थितीला वाळू माफियांची तेजी आहे. राजरोसपणे आमटेम-निगडेच्या खाडीत वाळू उत्खनन सुरू आहे.
एकीकडे वाळूबंदी करणाऱ्या शासनाचे अधिकारी तर दुसरीकडे याच शासनाचे रक्षक समजले जाणारे खाकीवाले हे आपल्या कार्यक्षेत्राच्या अखत्यारीत नसतानादेखील वाळू माफियांशी संगनमत करून राजरोसपणे संक्शन व बोटीद्वारे वाळू उत्खनन करणाऱ्यांना अभय देताना दिसत आहेत. आजच्या घडीला शासनाचे अधिकारी हे गांधारीची भूमिका निभावताना दिसत आहे. आमटेमच्या पुलावर जर आलात तर पुलाच्या दोन्ही बाजूला आमटेम निगडेच्या खाडीत कित्येक संक्शन पंप असलेल्या होडया सर्वसामान्यांना दिसतात. मात्र, सरकारी बाबू व खाकीवाल्यांना हे दिसत नाही. हे खरं पाहता आठवा चमत्कारच म्हणावा लागेल.
एकीकडे जिल्हाधिकारी किशन जावळे हे उत्तम प्रशासक म्हणून सर्वसामान्यांसमोर येत आहेत. ते व त्यांचे महसूल कर्मचारी निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. आमटेम-निगडेच्या खाडीमध्ये सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन तलाठी का बंद करू शकत नाही? अशा प्रकारची चर्चा सध्या जोरात आमटेम, निगडे, कासू, पांडापुर, शिहू, बेणसे, शहाबाज, वडखळ परिसरात सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे आमटेम-निगडेच्या खाडीमध्ये सुरू असणाऱ्या या अवैध उत्खननामागील खरा सुत्रधार हा राजकीय पक्षाच्या बडया नेत्याच्या भाच्याचा मित्र असल्याची देखील चर्चा सुरू आहे.
एकीकडे दादर-रावे परिसरात परंपरागत उदरनिर्वाहासाठी हातपाटी व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य गावकऱ्यांना बुडी मारून नियमबाहय जास्त वाळू काढल्यास कारवाई केली जाते. मात्र, हजारो ब्रास वाळूचे उत्खनन रोजच्या रोज होत असताना हे महसूल प्रशासनाला दिसू नये अथवा दिसून त्याकडे पाहू नये असे का घडते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता महसूल प्रशासनापेक्षा खाकीचे शिलेदारच या वाळूमाफियांना मदत करत असल्याचे समोर येत आहे. एका गाडीमागे रूपये एक हजार मोजले जात असल्याची चर्चादेखील जोरदार होत आहे. दर दिवसाला कमीत-कमी 8 ते 10 डंपर वाळू आमटेम-निगडेच्या खाडीवरून जात आहे. यामुळे खाकीच्या शिलेदारांचा धंदा देखील वाळू माफियांबरोबर तेजीत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच महसूल खात्याची सर्वांत मोठी अडचण अशी झाली आहे कि, येथील तलाठी संजय तवर हे नव्याने तेथे रुजु झाले आहेत. त्यामुळे त्यांना या वाळु उत्खननाबाबत फारशी कल्पना नसावी. तर मंडळ अधिकारी हे सतत गैरहजर असल्याने या वाळू माफियांचे फावले आहे. मात्र खाकीवाले उघड-उघड धनलक्ष्मीचे दर्शन घेउन या वाळू माफियांची पाठराखण करताना दिसत आहेत. तरी या वाळू माफियांवर वेळेस महसूल खात्याने लगाम घालणे गरजेचे आहे. या वाळू उत्खननाविषयी देखील उलट-सुलट चर्चा होत आहेत. मात्र एवढं नक्की कि महसूल खात्यापेक्षा पोलीस खाते या वाळू उत्खननामागे जबाबदार आहेत असेच म्हणावे लागेल.







