सरकारी विभागांच्या परवानग्यांचा विसर
। नेरळ । वार्ताहर।
कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी विना परवानगी मोठ्या प्रमाणावर रस्ता खोदून केबल वायफाय टाकण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. रस्ता खोदण्यापूर्वी एमएसआरडीसी, जल व्यवस्थापन विभाग कर्जत, फॉरेस्ट डिपार्टमेंट यांची कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणी लवकरात लवकर कार्रवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड कर्जत तालुकाध्यक्ष विशाल माळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कर्जत ते मुरबाड राष्ट्रीय महामार्ग 548 अ या रस्त्यालगत साईडपट्टी खोदून वायफाय केबल टाकण्याचे काम दोन अज्ञात कंपन्या करीत आहेत. हे केबल नदीच्या भागातून टाकण्यात येत आहेत. तसेच फॉरेस्टच्या जागेतून आणि रस्त्याच्या साईड पट्ट्यात देखील टाकण्यात येत आहेत. दरम्यान, संबंधित तिन्ही विभागांची परवानगी त्यांच्याकडे नाही आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रकारचे एमएसआरडीसी, जल व्यवस्थापन विभाग कर्जत, फॉरेस्ट डिपार्टमेंट यापैकी एकाकडूनही ना हरकत किंवा परवानगी त्यांच्याकडे आढळून आलेली नाही. तरी अशा बेकायदेशीर काम करणार्या कंपन्या आणि ठेकेदार यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि काम थांबविण्यात यावे. रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या खोदाईमुळे पावसाळ्यात अपघाताची शक्यता आहे. होऊ शकते, यामुळे मनुष्यहानी होऊ शकते. याची काळजी घेतली गेलेली नाही, तर अशा ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता काम केले असल्यास त्यावर योग्य ती चौकशी करून दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा अतिसंवेदनशील विषयांमध्ये संबंधित अधिकार्यांनी लक्ष घालून काम त्वरित बंद करावे. अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कर्जत तालुका अध्यक्ष विशाल माळी, श्रीकांत आगीवले, तीर्थेश शिंदे, गणेश पाटील, देवराम पवार, वैभव भुईकोट, नरेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्याच्या साईटपट्टीचा काहीभाग राईट ऑफ वे असल्याने ठेकेदाराला त्याबाबत काही परवानगी आहे का ? याची माहिती घेऊन तसेच वनविभागाच्या जागेत त्यांनी कुठे व किती प्रमाणात खोदकाम केले आहे. त्याची प्रत्यक्षरित्या पाहणी करून दोषी असल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
संदीप पाटील
कार्यकारी अभियंता,
एमएसआरडीसी
