साईडपट्टी नष्ट झाल्याने अपघाताचा धोका
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब या वर्दळीच्या रस्त्यावर महिनाभरापूर्वी साईडपट्टी लगत केबल टाकण्याचे काम करण्यात आले होते. त्या रस्त्यावर एका खासगी नेटवर्क कंपनीकडून केबल टाकण्यात येत आहे. ही केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूची साईडपट्टी खोदून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होत असून, त्या ठिकाणी अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग केबल कंपनीला सहकार्य करीत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
नेरळ-कळंब रस्त्याच्या साईडपट्टीच्या दुर्दशेमुळे रस्त्याच्या बाजूने पायी चालणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे, असे समीकरण बनले आहे. या रस्त्यालगतची साईडपट्टी नष्ट झाल्याने अवजडवाहनांसह दुचाकी वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची साईडपट्टी खोदण्याचे काम सुरू असताना संबंधित अधिकार्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली होती. तसेच, या रस्त्यावर काम करणार्या पोट ठेकेदारांना व कामगारांना देखील याबाबत सावध केले होते. परंतु, ज्या कंपनीने हे काम हाती घेतले होते त्या कंपनीची ही जबाबदारी होती. त्याचबरोबर संबंधित खात्याने या कामासाठी साईडपट्टी वापरण्याची परवानगी असल्याबाबत प्रवाशांना व वाहतूकदारांना अवगत करणे आवश्यक होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही खोदलेली साईडपट्टी पूर्ववत करणे आवश्यक असताना त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांसह प्रावसी वर्गातून होत आहे.