जाहिरातीच्या प्रलोभनाला पडल्या बळी; प्रायव्हेट कंपनीकडून आर्थिक फसवणूक
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
एका प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देतो, अशी जाहिरात सोशल मिडियामार्फत देण्यात आली होती. अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरातील पदवीधर व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या मुली या जाहिरातीच्या प्रलोभनाला बळी पडल्या आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली. त्यासाठी मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेत त्या आर्थिक फसवणूक झालेल्या मुलींना न्याय देत त्यांची रक्कम परत मिळवून दिली आहे.
सॅपवर्ल्ड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देतो, अशी जाहिरात सोशल मिडियामार्फत देण्यात आली होती. त्या जाहिरातीच्या प्रलोभनाला मांडवा परिसरातील मुली बळी पडल्या. त्यांना नोकरीचे अमिष दाखविले गेले. त्यानंतर पिडित मुली पनवेल-करंजाडे येथील सॅपवर्ल्ड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये गेल्या. नोकरीला लावण्याकरिता त्यांच्याकडे 48 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पिडीत मुलींनी ही रक्कम दिल्यानंतर त्यांना कोणतीही नोकरी न देता महिनाभर ऑफिसमध्ये बसवून ठेवण्यात आले होते. एक महिना उलटूनही त्यांना पगार देण्यात आला नाही. त्यावेळी पिडीत मुलींना त्यांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला.
या घटनेनंतर पिडीत मुलींनी सॅपवर्ड मार्केटिंग प्रायव्हेट लिमीटेड या कंपनी विरूद्ध मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत ट्रस्टच्या पदाधिकारी अध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, उपाध्यक्षा स्नेहल म्हात्रे व कार्यालयीन प्रमुख अॅड. निवेदिता वाघमारे यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात पिडीत मुलींच्या आर्थिक फसवणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनतर मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रशांत घरत व वरिष्ठ अधिकारी सुमित खोत यांनी तात्काळ कारवाई करून पिडीत मुलींना त्यांना त्यांचे पैसे मिळवून दिले. मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे व पदाधिकारी यांच्या तत्परतेमुळे आर्थिक पिडित मुलींना न्याय मिळाला, अशी भावना जन सामन्यात व्यक्त होत आहे. या निमित्ताने अन्य कोणा मुलींची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहन देखील मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे करण्यात आले आहे.