तब्बल 8 तास हाल, खोळंबा, कोंडी आणि संताप; जनतेला नवीन पुलाची प्रतीक्षा

वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली व जांभूळपाडा अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने प्रवासी, चाकरमानी व वाहनचालक बेहाल

पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावरुन बुधवारी (दि.21) पाणी गेले. त्यामुळे प्रवासी, चाकरमानी व वाहने पुलाच्या दोन्ही बाजूस अडकून पडले होते. तब्बल 8 तासांनंतर रात्री 11 नंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली.
परिणामी, तब्बल 8 तासांहून अधिक काळ प्रवासी, वाहन चालक व चाकरमानी यांचे पुरते हाल झाले. गुरुवारी (ता.22) देखील पुलावरून पाणी गेल्याने लोक अडकून पडले होते. सायंकाळी सातनंतर पाणी ओसरल्यावर वाहने व लोक पलीकडे गेले. पाली व जांभुळपाडा अंबा नदीवरील पुलाचे काम धीम्या गतीने होत आहे, जनतेला या पुलां ची प्रतीक्षा आहे. सततच्या त्रासाला नागरिक कंटाळले. ही परिस्थिती जाण्यासाठी येथील पूल लवकर बनविण्यात यावेत असे सम्यक क्रांती विचार मंचाचे अध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी संगितले.

सकाळी पुन्हा गेले पाणी
गुरुवारी (ता.22) सकाळी साडेसातनंतर पाली अंबा नदी पुलावरून व 12 नंतर जांभूळपाडा अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती.
वाकण पाली खोपोली मार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई बैंगलोर जोडतो तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी व वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी येथील पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास वारंवार प्रवाशी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात व त्यांची गैरसोय होते.


पाली व जांभुळपाडा अंबा नदीवरील पूल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात. मुसळधार पाऊस असल्याने पाली अंबा नदी पुलावरून पाणी गेले. सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. व अधिक सतर्क राहावे.
दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Exit mobile version