मच्छिमारांच्या 400 नौका दाखल
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. होळी सणासाठी कोरोनामुक्त वातावरण असल्याने मुंबई, पुण्यातून चाकरमानी आले आहेत. सलग सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात शनिवारपासून तालुक्यात दाखल झाले आहेत. हॉटेल्स, लॉजिंग बुक होत आहेत. काशीद बीचवरदेखील पर्यटकांची वर्दळ आहे, अशी माहिती लॉजिंग मालक मनोहर बैले यांनी दिली. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते, असा अंदाज काहींनी व्यक्त केला.
होलिकोत्सव हा कोळी बांधवांचा मोठा सण असल्याने मुंबईच्या समुद्रात मासेमारी करणार्या सर्व नौका राजपुरी, नांदगाव, एकदरा, मुरूड, दिघी आदी बंदरात दाखल झाल्या आहेत. मासळी उत्पादन घटले असल्याने मच्छिमारांच्या हाताशी पैसे कमी आहेत. तरीदेखील होळी साजरी करण्यासाठी कोळी बांधवांच्या नौका पताका, झुली सजवून वाजत गाजत समुद्रात रंगांची उधळण करीत दाखल झाल्या आहेत. मुरूड, एकदरा, बोर्ली खाडीत नांगरलेल्या नौकांची गर्दी झाली असून, एकदरा पुलावर मच्छिमारांचा होळीचा आनंद आणि उत्साह पाहण्यासाठी नागरिकांची नोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते. होळीसाठी सर्व कोळीवाडे सज्ज झाले आहेत. येथील होलिकोत्सव संस्कृती पाहण्यासाठी परदेशी पर्यटक देखील येत असतात. गेले 10 दिवस मुरूड शहर सह गावांतून छोट्या होळ्यांचे रोज दहन आणि आहुती दिली जाते. तर मुख्य होळीच्या दिवशी सर्वजण श्रीफळ अर्पून प्रार्थना केली जाते. नंतर तो प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.
मुख्य होळी पौर्णिमा दिवशी मुरूडसह विविध गावातून सुपारी अथवा भेंडीच्या काठीचे झाड बाजारनाक्यावर युवक नाचवत आपल्या गावात सायंकाळपर्यंत वाजत गाजत नेत असतात. मुरूड, राजपुरी, एकदरा, दिघी, बोर्ली, नांदगाव येथील खाडी बंदरात 400 पेक्षा अधिक नौका रविवारपर्यंत दाखल झाल्याची माहिती एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर आणि नाखवा रोहन निशानदार यांनी दिली. गणेशोत्सवानंतर कोळी बांधवांचा होळी हा महत्त्वाचा सण मानला जातो. मुरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांची लोकवस्ती आहे. ठिकठिकाणी समुद्रात डीजेवर नृत्य करीत नौकांतून मच्छिमार दाखल होताना दिसत आहेत.
धुळवड देखील कोळी समाजाचा महत्वाचा दिवस असून या दिवशी दुःखी घरातील माणसांना होळी मैदानावर आणून सन्मानाने आनंदात सामील केले जाते, अशी माहिती मुरूड कोळी समाजाचे रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. मुरूड कोळीवाड्यात सर्व महिला भगिनी एकाच पद्धतीच्या पारंपरिक साड्या परिधान करून होळी भोवती फेर धरून नृत्य करतात. खूप धमाल आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा होलिकोत्सव पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कोळी बांधव आणि नागरिक आवर्जून उपस्थित असतात.