माथेरानमध्ये पाणी चोरीवरून खळबळ

हॉटेल मालकांसाठी पालिकेच्या पायघड्या?

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून शहरात हॉटेल लॉबीसाठी पायघड्या घातल्या जात असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील एका हॉटेलसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी पोहचवले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्षाने उधळवून लावला आहे. दरम्यान, माथेरान पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी वाटपाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पाणी चोरी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट असताना माथेरानमध्येही पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.वॉटर सप्लायच्या फिल्टर हाउस येथून थेट अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलेक्झांडर हॉटेलला दोन इंची पाण्याची लाईन देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. माथेरान नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला कपात केली जात आहे. शहरात ऐन पावसाळ्यात पाणी नव्हते आणि आता हॉटेल व्यावसायिक यांच्यासाठी तीन इंचाची जलवाहिनी टाकून पाणी देण्याचा घाट सुरू आहे. दरम्यान, माथेरान नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हे काम बंद ठेवण्यास भाग पाडले. यावेळी त्यांनी माथेरानचा पर्यटन हंगाम सुरळीत चालण्यासाठी सर्व हॉटेल्ससोबत सामान्य नागरिक, लॉज धारक, स्टॉल धारक यांना देखील पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे. नगरपरिषद प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाने याचे स्पष्ट उत्तर द्यावे. तसेच, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version