शार्लोट लेकमधून गढूळ पाण्याचा पुरवठा; साथीचे आजार बळावण्याची चिन्हे
| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शहराला गढूळ आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या पाण्यामुळे एकूण शहराचेच आरोग्य धोक्यात आले आहे. माथेरान शहरात सध्या शार्लोट लेकमधून पाणी पुरवठा केला जात आहे. लेकमधील पाणी गढूळ असल्याने तसेच पाणी शहरात सोडले जात असून, गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे.
माथेरानमध्ये ब्रिटिश काळात शार्लोट लेक तलाव बांधण्यात आला. त्या तलावातून पाण्याचा पुरवठा शहरातील नागरिकांना होत होता. पुढे थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्याने माथेरानमध्ये येणारे पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे माथेरानमधील नागरिकांना आणि हॉटेल व्यावसायिक, अन्य व्यावसायिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी उल्हास नदीवरून देखील पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, पावसाळ्यात उल्हास नदीवरून पाणी उपसा बंद ठेवला जातो.
शहरात असलेल्या शार्लोट लेकमधून पाणी उचलले जात असून, माथेरान शहरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शार्लोट लेकमधून नळावाटे येणारे पाणी हे दूषित आणि गढूळ येत आहे. माथेरान शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याचा पुरवठा करीत असून, शहरात पावसाळा असल्याने शार्लोट लेकमधील पाणी पूर्णपणे गढूळ आहे. तेच पाणी स्थानिकांना नळावाटे दिले जात असल्याने माथेरानमध्ये साथीचे आजार बळावण्याची चिन्हे आहेत. शार्लोट लेकमधून संपूर्ण पावसाळ्यात पाणी उचलून त्या प्राण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून पुढे वितरित केले जात असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मात्र, शहरात नळाद्वारे येणारे पाणी हे अशुद्ध आणि दूषित तसेच गढूळ असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी अभ्यासपूर्ण विवेचना करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळाद्वारे देणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करीत नसल्याचा आरोप केला आहे. जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणी न पोहचता ते थेट वितरित केले जात असल्याचा आरोप केला आहे. माथेरान सारख्या महत्वाच्या पर्यटनस्थळावरील नळपाणी योजना चालवणाऱ्या जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हे केवळ पाणी पट्टी वसूल करण्यासाठी येत असल्याचा आरोप केला आहे. सहाय्यक अभियंता आणि शाखा अभियंता पुर्णवेळ कधीही माथेरानमध्ये दिसून येत नाहीत. खासगी ठेकेदाराकडे पाणी शुद्धीकरण केंद्राचा कारभार देण्यात आल्याने जंतुनाशक न टाकताच पाणी सोडले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर माथेरान नगरपरिषदेकडून पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली असता 80 टक्के पाणी दूषित असल्याचे सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठेकेदाराला पोसण्याचे काम करीत आहे. प्राधिकरणाचा ढिसाळ कारभार यामुळे माथेरानमधील जनतेचे आरोग्य बिघडण्याची चिन्हे आहेत. गढूळ आणि दूषित पाण्यामुळे आजार बनवण्याची चिन्हे असून, नगरपरिषदेने प्राधिकरणाच्या कारभारावर जिल्हाधिकाऱ्यांना कळवले पाहिजे.
जनार्दन पारटे
सामाजिक कार्यकर्ते







