| मुरुड | वार्ताहर |
शारदीय नवरात्रौत्सवाला आता पाच सहा दिवस उरले असताना मुरुड तालुक्यातील यशवंतनगर नांदगावपंचक्रोशीतील मूर्तिकारांची देवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू असून नांदगाव मधील जितेंद्र विनायक चोरघे यांनी आकर्षक व्याघ्रारुढ मूर्ती तयार केली आहे.
नांदगाव व आजुबाजुच्या परिसरात असलेल्या नवरात्रौत्सव मंडळांनी केलेल्या मागणीनुसार येथील जितेंद्र भाटकर, राजाराम ठाकुर, चंद्रकांत बुल्लु व अन्य मूर्तीकार देवींच्या आकर्षक मूर्त्या घडविण्यात मग्न झाले आहेत. देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असून, घरगुती देवीच्या मूर्ती तयार झाल्या असून, मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आठवड्याभरावर आलेल्या नवरात्रोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण पनवेल परिसरात अनुभवयास मिळत आहे.
घटस्थापनेसह देवीच्या मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही वाढली आहे. त्यांच्याकडून देवीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घरगुती देवीच्या मूर्ती तयार झाल्या आहेत; तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत त्यांचेही काम पूर्ण होणार आहे. अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती साकारण्यासह विविध प्रकारच्या तयारीला वेग आला आहे. एक फुटांपासून दहा बारा फुटांपर्यंत देवीची मूर्ती साकारल्या जात आहे; तर यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये 50 रुपयांनी वाढ तसेच अन्य खर्चांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवीच्या मूर्तींना मागणी वाढली आहे.
ग्रामीण भागात उत्साह सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहे. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. सध्या दोन, पाच ते पंचवीस हजारांपर्यंतच्या मूर्ती बाजारात उपलब्ध असून पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवास होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तसेच पूर्वी ग्रामीण भागातील तरूण वर्ग गरबा खेळण्यासाठी शहरी भागांकडे येत होता. परंतु, ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जात असल्याने ठिकठिकाणी गरबा आकर्षण राहणार आहे.
