जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पुढाकार
| वाघ्रण | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील वैजाळी (हाशिवरे) ग्रामपंचायत आणि अंगणवाडी प्रांगणात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने परिचारिका प्रशिक्षण केंद्रांतर्गत पोषण आहार पदार्थ प्रदर्शनाचे आयोजन 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. ग्रामपंचायत सरपंच शैला पाटील यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता या प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच शालिनी मोकल, सदस्या अरुणा पाटील, सदस्य अविनाश मोकल व ग्रामसेविका सुप्रिया कोळी, पत्रकार दीपक पाटील, रत्नकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तर प्रदर्शन संयोजनाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या प्रा. गायत्री म्हात्रे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाचे महत्त्व विशद करताना शून्य ते पाच वयोगटातील लाभार्थ्यांना त्याचबरोबर गरोदर आणि स्तनदा मातांना कोणत्या व्हीटॅमिन्सची गरज असते, ते कसे मिळवायचे, त्याचा फायदा काय, हे सविस्तर पटवून दिले.
यावेळी पेढांबे प्राथमिक केंद्राचे आरोग्य सहाय्यक गणेश गायकवाड आणि सेविका आरती पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका विनोदिनी मोकल यांनी प्रदर्शनातील एएनएम व एलएचव्ही 44 मुलींशी प्रत्यक्ष बातचीत केली. हे प्रदर्शन प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी शिक्षक सागर साळवे, नम्रता नांगले, धनश्री पाटील, रसिका पाटील, सुचित्रा काळे, सोनाली सारीका, अंगणवाडी सेविका रूपवंती गावंड यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी भोईर यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.