पारंपारिक चित्रांचा ‌‘सोहळा’ जहांगीर आर्ट गॅलरीत

दीपक पाटील यांच्या कुंचल्याचे प्रदर्शन 4 जूनपासून

| रायगड | प्रतिनिधी |

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रकार दीपक रमेश पाटील यांचे सोहळा शीर्षकाखाली पाचवे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे 4 जून ते 10 जून या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. हे चित्रप्रदर्शन सर्वांना सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे पाहता येईल. तरी सर्व कला रसिकांनी दीपक पाटील यांच्या मनमोहक चित्रांचा जरूर आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या आपल्या देशात अनेक सण, उत्सव, समारंभ अतिशय आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. यातून आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असते. समाजाची एकसंघता टिकवण्यासाठी सण-उत्सव, लग्नकार्य या अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते. लोकांमध्ये एकोपा वाढावा, माणुसकी जिवंत राहावी, नात्यातील गोडवा वाढावा हा या सणांचा उद्देश असतो. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती प्रचलित होती. घराघरांमध्ये लहान मोठ्यांचा गोतावळा असे. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, शेजारी-पाजारी असे सर्वजण सणावाराला, शुभकार्यात एकत्रित यायचे, सोहळे साजरे करायचे. दीपक पाटील यांनी त्यांच्या चित्रांमधून याच काळातील त्यांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


आताच्या काळात विभक्त कुटुंबपद्धती दिसून येते, यामुळे कुटुंबे जरी छोटी झाली तरीही प्रत्येक दिवसच खास दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे कारण असे आहे की, रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला नवचैतन्य मिळावे, तो पुन्हा नव्या जोमाने कामाला उद्युक्त होईल. जितके उत्सव जास्त असतील तितकी समाजाला प्रगती होण्याची संधी मिळते. सण-उत्सव नसतील तर मानवी समाजजीवन रूक्ष व बेचव होईल. हाच धागा पकडून दीपक पाटील यांनी या शीर्षकाखालील प्रदर्शनात चित्र विषय निवडले आहेत. या चित्र विषयांमध्ये काही चित्रे धार्मिक सोहळे, कौटुंबिक सोहळे या विषयांवर चित्रित केलेले आहेत. तर काही चित्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांचे गमती-जमतीचे क्षण चित्रित केले आहेत. दीपक पाटील यांच्यासाठी सर्व कुटुंबाने एकत्र येऊन केलेली प्रत्येक गोष्ट सोहळा आहे. असे सुंदर क्षण सर्वांच्या आयुष्यात यावे, सर्वांनी असे सोहळे साजरे करावे असे त्यांना नेहमीच वाटते. म्हणून त्यांनी या चित्र प्रदर्शनास ‘सोहळा’ असे नाव दिले आहे.


दीपक पाटील त्यांची चित्रे वास्तववादी पद्धतीने साकारतात. त्यांच्या चित्र विषयांमधून भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन होते. त्यांच्या सर्व कलाकृती आपल्या देशाच्या समृद्ध, खानदानी, पारंपारिक आणि प्राचीन संस्कृतीचा पवित्र वारसा दर्शविणाऱ्या आहेत. असा वारसा जपून आणि चित्रबद्ध करून याचा ते जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यांच्या रंगलेपनात त्यांनी एक विशिष्ट शैली जपलेली आहे. चित्रांची रचना, रंगसंगती, प्रकाशाची योजना उत्कृष्ट आहे. त्यांचे चित्र स्मृतीच्या कोशात घेऊन जातात. त्यांच्या चित्रांमधील बारकावे आपल्याला संस्कृतीकडे घेऊन जातात, दैनंदिन जीवनातल्या देखण्या गोष्टींकडे घेऊन जातात, जे आपण अनेक वर्ष मागे सोडून आले आहोत.


त्यांच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने गणपती आरती, लक्ष्मी पूजन, नामकरण समारंभ, लक्ष्मी आगमन, हळदी समारंभ, बहीण-भावामधील रेशमी बंध, नव्या नवरीचे हितगुज, आजोबा नातवंडांमधील सुरेख गोड क्षण अतिशय तन्मयतेने टिपले आहेत. त्यांच्या चित्रातील साधेपणा, कौशल्य, चित्र विषयातील रंगसंगतीचा सोहळा बघायला सर्वांनाच आवडेल.

Exit mobile version