एक्सिट पोल 2024ः राज्यात इंडिया आघाडीच

। मुंबई । प्रतिनिधी ।

लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सातवा टप्पा पार पडला आहे. या निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या उलथापालथीनंतर यंदाची ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची होती. दरम्यान, या निवडणुकीत राज्यात इंडिया आघाडीच बाजी मारणार असून, 25 जागा जिंकेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला असून, हा महायुतीला 22 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, हा फक्त अंदाज असून, खरं काय ते 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

राज्यात एकूण लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यात महायुतीला 22, महाआघाडीला 25 आणि 1 जागा अपक्ष उमेदवाराला मिळणार असं दिसत आहे. तर महाराष्ट्रातल्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 18, शिंदेच्या शिवसेनेला 4, काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला 6 जागा मिळतील. तर अजित पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही. या एक्झिट पोलमुळे आतापासून राज्याचं राजकीय गणित विस्कटल्याचं दिसत आहे.

देशभरातील जनतेचे डोळे या निकालाकडे लागले आहेत. अशातच रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील आकडेवारी जाहीर केली आहे. महायुतीला राज्यात जबर फटका बसणार हे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहे. यात प्रस्थापितांना जनतेने धोबीपछाड दिल्याचंही अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्वाधिक लक्ष शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटाकडे लागून होतं. पण, एक्झिट पोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार असं चित्र दिसत आहे. तर, अजित पवार गटाला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. मात्र, राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात बरीच उलथापालथ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याभोवती राजकारण फिरत होतं. उद्धव ठाकरे यांना मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला किती जागा मिळतील याची उत्सुकता होती. एक्झिट पोलचा अंदाज धक्का देणारा आहे. शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 4 जागा मिळतील. तर ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असं दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेवर भारी पडतील असं दिसत आहे.

Exit mobile version