शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या ?

15 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता.


। मुंबई । वृत्तसंस्था ।

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे. 10 ते 12 मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील माहिती आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात तूर्तास छोटेखानी विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा रंगलीय. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version