। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या वादामुळे हा विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे. तर, विरोधकांकडूनही सातत्याने हे सरकार कोसळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही, असेही बोलले जाते.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्ली दौर्यावर जाणार आहेत. त्यामुळे, उद्या किंवा परवा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा होती. मात्र, आता महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्तार 26 किंवा 27 जुलैला होण्याची शक्यता आहे. कारण, 23 जुलै राज्यात भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर, 24 जुलै रोजी राज्यभर आदिवासी पाड्यावर जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.
देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान झाल्याने भाजपाकडून हे सेलिब्रेशन होत आहे. त्यानंतर, 25 जुलै रोजी राष्ट्रपती शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहील. त्यामुळे, राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला असून 26 किंवा 27 जुलै रोजी हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा विचार शिंदे सरकारचा आहे. तत्पूर्वी, महिनाअखेर मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो.