विस्तार, खातेवाटप अजुनही गुलदस्त्यात

| मुंबई | प्रतिनिधी |

संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या खातेवाटपाचा तिढा गुरुवारीही सुटू शकला नाही. त्यामुळे सरकारमध्ये नेमके चालले काय, अशी विचारणा आता सर्वस्तरातून होऊ लागली आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला अर्थखात्यासह अन्य वजनदार खाती मिळणे अपेक्षित आहे. पण त्यावरुन शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. शिवाय भाजपमध्येही कमालीची अस्वस्थता निर्माण झालेली आहे. शिंदे, भाजपकडून आपापल्या नाराज आमदारांची समजूत काढली जात आहे. गुरुवारी भिवंडीत भाजप आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. तर शिंदे गटाचे आमदार वर्षावर ठाण मांडून आहेत. बुधवारी रात्री अजित पवारांनी प्रफुल्ल पटेंलांसमवेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली खरी, पण त्यातून काहीच तोडगा निघू शकला नाही. खातेवाटप कधी होईल याबाबत कुणीच ठोसपणे सांगताना दिसत नाही. एकूणच सारेकाही अलबेल चालले नसल्याचे बोलले जाते.

शिंदे गटाच्या नशिबी वेटिंगच
तातडीने मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पावसाळी अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. आधी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नंतर खातेवाटपाचे पाहू, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती. मात्र, अजित पवार यांची दिल्लीवारी तसेच फडणवीस अजितदादा यांच्या बैठकानंतर मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवशेनानंतर करण्यास एकनाथ शिंदेंनी होकार दर्शवल्याची माहिती आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या चार ते पाच साथीदारांनाच मंत्रिपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील उर्वरित आमदारांमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version