कडव्या झुंजीची अपेक्षा

कर्नाटक विधानसभेचे तिकिटवाटप सुरू आहे. उमेदवारी न मिळालेले नाराज सर्वच पक्षांमध्ये आहेत. पण भाजपमध्ये त्यांची संख्या जास्त आहे. शिवाय अनेक वजनदार लोकांनी बंडखोरी केली आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना तिकिट मिळणार नाही हे रविवारीच स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी यादी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. गेली चाळीस वर्षे ते भाजपमध्ये होते. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला फारसे स्थान नाही. भाजपचे बहुसंख्य केंद्रीय नेते आजवर हिंदी पट्ट्यातील राहिले आहेत. त्याचा हा परिणाम आहे. शिवाय, गायपट्ट्यातील हिंदुत्व हे ब्राह्मणी, शाकाहाराला महत्व देणारे, संकुचित राहिले. दक्षिणेकडे ओबीसी जाती प्रबळ आहेत. तमिळनाडू, केरळ आणि आंध्रामध्ये त्यांनी बर्‍याच काळापूर्वी सत्ता मिळवली आहे. कर्नाटकातही लिंगायत आणि वोक्कलिग या जातींचा प्रभाव आहे. भाजपने लिंगायतांमध्ये शिरकाव केला. त्यांचे नेते असलेल्या येड्डियुरप्पांना मुख्यमंत्री केले. आता वयाच्या ऐंशीव्या वर्षीदेखील भाजपला त्यांना निवृत्त करता आलेले नाही. तिकिटवाटपामध्ये त्यांचाच वरचष्मा आहे. सध्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही लिंगायतच आहेत. शेट्टार हेही लिंगायत. मात्र त्यांच्यात आपसात दुही होती. ती सांधणे भाजप नेत्यांना शक्य झाले नाही. शेट्टार हुबळी-धारवाड भागातून येतात. येथे वर्षानुवर्षे मुस्लिमांच्या विरोधात वातावरण पेटवून हिंदूंना संघटित केले गेले. हुबळीच्या ईदगाह मैदानात ध्वज लावण्यावरून काही वर्षांपूर्वी दंगे झाले होते. आता त्याच हुबळी परिसरात भाजपला खिंडार पडणार आहे. हिंदू सगळे एक अशी भाषा बोलायला आणि रस्त्यावरच्या लोकांना पेटवायला ठीक असते. प्रत्यक्षात सत्ता वाटपाची वेळ येते तेव्हा हेच हिंदू एकमेकांच्या उरावर बसतात. कर्नाटक भाजपमधील हा पहिला संघर्ष नाही. येड्डीयुरप्पांच्या विरोधात यापूर्वी असे उठाव झाले होते. गेल्या निवडणुकीत पुरेसे बहुमत न मिळाल्याने येड्डियुरप्पांनी जेव्हा सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यांच्याच पक्षातून पाठिंबा मिळाला नव्हता. येड्डियुरप्पा हे कडवे धर्मांध राजकारण करण्यापेक्षा बेरजेचे राजकारण करणार्‍यांपैकी आहेत. त्यामुळे त्यांचे तेजस्वी सूर्या वगैरे बजरंग दल छाप भडक नेत्यांसोबत जमत नाही. हिजाब वगैरेंच्या मुद्द्यांवरून कर्नाटकात गेल्या वर्षी भाजपने बरीच पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न केला. येड्डियुरप्पा हे मात्र असे विषय सलोख्याने सोडवावेत असे म्हणत होते. पण आता दिल्लीच्या प्रभावामुळे भडक नेत्यांना कर्नाटक भाजपमध्ये प्रमुख स्थान मिळू लागले आहे. त्यातूनच शेट्टार यांना बाजूला केले गेले आहे. यापूर्वी बेळगाव-अथणीचे लक्ष्मण सवदी या वजनदार नेत्यांनाही असेच डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनीही बंडखोरी केली आहे. विरोधी काँग्रेस किंवा देवेगौडांचे जनता दल यांच्याकडेही कुरबूर आहेच. तरीही काँग्रेसकडे शिवकुमार व सिध्दरामय्या यांच्यासारखे लोकप्रिय नेते आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे तर राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या पक्षात सध्या अधिक उत्साहाचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे एरवी अनुत्साही असणारे राहुल गांधी हे आतापासूनच प्रचारात सक्रिय झाले आहेत. भाजपला कडवी झुंज देण्याची तयारी झाली आहे.  

Exit mobile version