चोरीच्या पैशांतून प्रेयसीला महागडी भेट

राम मंदिर देणगी अपहारात आरोपीचा धक्कादायक खुलासे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अविनाश शुक्ला याच्या बँक खात्यात लाखो रुपयांचे व्यवहार आढळून आले असून, चोरीच्या पैशांतून त्याने प्रेयसीला महागडा आयफोन आणि दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

अविनाश शुक्ला याला राम मंदिरातील दान मोजणी केंद्रात कंत्राटी स्वरूपात दरमहा सुमारे 15 हजार रुपयांच्या वेतनावर नोकरी होती. मात्र, या अल्प पगारातही त्याने पत्नीच्या नावावर घर बांधले, महागडी ब्रेझा कार खरेदी केली आणि ऐषआरामाची जीवनशैली स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून, बँक खात्यातील सर्व व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

चौकशीत अविनाशने चोरीच्या पैशांची आरोपींमध्ये वाटणी होत असल्याची कबुली दिली आहे. तसेच, मंदिरातील देणगीतील रक्कम अपहार करून ती विविध ठिकाणी खर्च केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, विशेष तपास पथक पुढील तपास करत आहे.

Exit mobile version