पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात; कोर्टाने सुनावला पाच हजाराचा दंड

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
तालुक्यात वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. मात्र यादरम्यान काही नागरिक पोलिसांना सहकार्य न करता पोलिसांशी हुज्जत घालतात, अरेरावी करतात, असाच प्रकार पालीतील पोलिसांबाबत घडला. मात्र यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीची तक्रार थेट न्यायालयाकडे केली. त्यानंतर या व्यक्तीला न्यायालयात हजर केले असता पाली कनिष्ठ न्यायालयाने आरोपीस 5 हजाराचा दंड ठोठावला आहे. यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

यासंदर्भात फिर्यादी पोलीस हवालदार ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या माहितीनुसार सविस्तर हकीकत अशी की, पाली खोपोली रोडवर गणेश हॉटेलजवळ बिरप्पा कलप्पा पुजारी (38) हा आपल्या ताब्यातील होंडा शाईन क्र एम एच 12 आर व्ही 7379 ही मोटारसायकल वाहन परवाना नसताना चालवीत असताना आढळून आला. मात्र यावेळी पोलिसांशी हुज्जत घातल्याने पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाली यांच्यासमोर हजर केले. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाती घटनांवर नियंत्रण येईल, लायसन्स व कागदपत्रे सोबत ठेवल्यास पोलिसांशी वाद होणार नाहीत, शिवाय दंड देखील ठोठावला जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

रस्ते सुरक्षा व सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी याबरोबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

-विश्‍वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक पाली

Exit mobile version