। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शारीरिक व्यायामातून शरीर स्वस्थ, सुदृढ होते; पण मन सशक्त आणि मजबूत ठेवण्यासाठी, आपला आत्मविश्वास दृढ करण्यासाठी खरी गरज आहे ती योग साधनेची. या योग साधनेतूनच जन्म-मृत्यूच्या पलीकडे मोक्षाची अनुभूती घेता येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध योगा अभ्यासिका सिम्पल हिमांशू सहानी यांनी अलिबाग येथे बोलताना केले. शहरातील मयूर बेकरीच्या इमारतीवरील सभागृहात आयोजित योग आणि गंमत प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. या योग कार्यशाळेत किशोरवयीन मुली, विवाहिता, तरुणी आणि तरुण सहभागी झाले होते. सिम्पल सहानी यांनी, योग साधनेत ओंकाराचे महत्त्व काय आणि तो कशा प्रकारे लावावा, हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटवून दिले. श्वासावर नियंत्रण कसे ठेवावे, याविषयी माहिती दिली.
योग साधनेत अष्टांगाचे महत्त्व विशद करताना ते कोणते आणि त्यांचे कार्य कोणते, ते कशा प्रकारे करावे याची माहिती दिली. यात प्राणायाम किती आणि कसा महत्त्वाचा हे प्रात्यक्षिक करून पटवून दिले. त्यानंतर योग साधनेतील आसने कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना त्यांच्या अनुयायांनी करून दाखविली. आणि ती आसने त्यांच्याकडून करून घेतली. यामध्ये सूर्यनमस्कारासह इतर काही आसनांचा समावेश होता. विशेष म्हणजे, सिम्पल सहानी यांनी योगामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. आयुष्य मंत्रालयाकडून त्यांना योगा प्रशिक्षक म्हणून प्रशस्तीपत्र मिळाले आहे. गेली सात वर्षे त्या देशात आणि परदेशात जाऊन योग साधनेवर प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत.