फूलकीड नियंत्रणासाठी आंबा बागांमध्ये प्रयोग

प्रत्येकी पाचवेळा औषध फवारणी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा पिकावरील फूलकीड नियंत्रण पथदर्शी कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी चार गावांमधील आंबा बागांमध्ये फूलकीड नियंत्रणासाठी प्रयोग केला जाणार आहे. मागील वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन बागांमधील थ्रिप्सवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले होते, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली आहे.

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांबरोबर झालेल्या बैठकीत फूलकिडीवरील नियंत्रणाविषयी प्रत्यक्ष बागेत जाऊन संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावे निवडण्यात आली होती. गतवर्षी काही प्रमाणात यश मिळाल्यामुळे यंदा बागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण कृषी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंबा टास्कफोर्सच्या बैठकीत यावर चर्चा देखील झाली आहे.

त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांतील आठ गावांमधील बागांमध्ये थ्रिप्स नियंत्रणावर प्रयोग केला जाणार आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट (दापोली), गोळप, नागलेवाडी (रत्नागिरी) आणि पालशेत (गुहागर) येथील शेतकर्‍यांच्या बागा आहेत. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा, देवली (मालवण), फणसे, खुडी (देवगड) या चार बागा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषी विभागाकडून आवश्यक औषधे, खते किंवा लागणारे अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर, कृषी विद्यापिठाचे संशोधक औषध फवारणीच्या वेळापत्रकासह त्यामध्ये होणारे बदल यावर लक्ष ठेवणार आहेत. पुढील आठ दिवसांमध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version