महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मागील वर्षी 2024-2025 च्या हंगामातील पुनर्रचित हवामान अधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी विम्याची नोंद केली. 2025- 2026 या येणाऱ्या हंगामाचा प्रिमिअम भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरला संपणार आहे. तरीदेखील आजपर्यंत रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या हक्काची विमा नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. याबाबत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांना निवेदन देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यासाठी युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. कंपनीने निश्चित केलेला विमा हवामान विभागाच्या माहितीच्या अधारे पुन्हा तपासणी करून अचुक विमा रक्कम निश्चित करावी. विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी, असे पुणे येथील नियोजन व प्रक्रिया कृषी आयुक्तालयाचे संचालक यांनी 17 ऑक्टोबरला दिलो आहे. मात्र, वीस दिवस उलटूनही कंपनीकडून कार्यवाही झाली नसल्याचा आरोप संघाकडून करण्यात आला आहे.
2021 ते 2024 या तीन वर्षाच्या कालावधीत सिंधूदुर्ग जिल्ह्याला हेक्टरी सात हजार रुपये व रायगड जिल्ह्याला 29 हजार 400 रुपये म्हणजे चारपट अधिक प्रिमिअम (हप्ता) होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. त्याचा परिणाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या योजनेत अत्यल्प सहभाग होता.मागील वर्षी सिंधूदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेने दुप्पट प्रिमिअम होता. त्यामुळे जिल्ह्यातील 56 हजार शेतकऱ्यांपैकी फक्त पाच हजार 235 शेतकऱ्यांनी तीन हजार 981 हेक्टर इतक्या क्षेत्रासाठी विमा उतरविला होता. तेदेखील पैसे मिळण्यास दिरंगाई का असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. रायगड व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा फळपिक विमा नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी चंद्रकांत मोकल यांनी केली आहे.
शेतकरी वर्गात संताप
सिंधूदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळाली आहे. मात्र रायगडसह पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी निर्माण झाली असून संताप व्यक्त करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.






