| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना, दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही? शेतकऱ्यांना शासकीय मदत किती मिळाली, याचा आढावाच ते या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी बुधवारी (दि.5) धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मत नाही हे बोर्ड लावा, निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड लावा, असे आवाहन ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय.
धाराशिव येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईतून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीय, मी तुमच्याशी बोलायला आलोय. मुख्यमंत्री म्हणाले इतिहासतली सगळ्यात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोक पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी धाराशिव दौऱ्यातून सरकारवर केली.
विमा कंपन्याना सांगतो की, शेतकऱ्यांची सगळी रक्कम द्या, नाहीतर हे सगळे तुमच्या ऑफिसवर येतील. फसल योजनेमध्ये तुम्हाला फसवलं आहे. फसलमध्ये फसवलं आहे. लाडकी बहीणमध्ये सगळ्यांना पैसे मिळत होते आता कुटुंबातील दोघांनाच पैसे मिळत आहेत. केंद्राचं पथक आलंय, तुम्ही पाहिलं का? सगळं झाल्यानंतर महिन्यानंतर हे पथक पाहणी काय करणार? केंद्राचा पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा असे बोर्ड दाखवा. शेतकरी एकदा उसळला तर तुमचं सिंहासन जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मतं नाही हे बोर्ड लावा, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलं.






