| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्यावतीने रविवारी (दि.15) उरण-म्हातवली येथील माऊली हॉलमध्ये क्रिकेट पंचांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर एकूण 100 दिवस ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा वर्ग घेऊन होणार असून या शिबिरात जिल्ह्यातील 50 पंचांनी सहभाग घेतला आहे. शिबिरात एमसीसी क्रिकेट लॉ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एकदिवसीय, टी-20 व मल्टी डेज क्रिकेट सामन्यांच्या नियमांसह आयसीसीचा झेल घेण्याचा नवीन नियम, तसेच इतर नियमांचे प्रात्यक्षिके करून नियम समजावून सांगण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी माजी रणजीपटू व विद्यमान बीसीसीआयचे पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट असो.चे पंच राजन कसबे व क्रिकेट नियमांंचे तज्ज्ञ नयन कट्टा आदी उपस्थित होते.
यावर्षी आरडीसीएतर्फे सर्व वयोगटातील मुलामुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मिळून जवळपास 300 सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, महाराष्ट्र क्रिकेट असो.च्यावतीने 16 वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील 15 दोनदिवसीय सामन्यांचे आयोजन रायगड जिल्ह्यात करण्यात आले होते. या सर्व सामन्यांसाठी जिल्ह्यातील प्रशिक्षित पंचांनी आपले योगदान दिले. गतवर्षील महाराष्ट्र क्रिकेट असो.च्यावतीने घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत जिल्ह्यातील 8 पंच स्टेट पॅनल परीक्षा उतीर्ण झाले होते. त्यांचा सत्कार देखील आरडीसीएच्यावतीने करण्यात आला. यावेळी आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील, डी.के भोईर व ॲड. पंकज पंडित उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात जास्तीजास्त प्रशिक्षित पंच तयार व्हावेत यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशन कायम प्रयत्नशील असणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी सांगितले.
उरणमधील पंच शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन
