कॅन्सर आजारावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात सोमवार दि. 29 जुलै रोजी ‘कॅन्सर अवेअरनेस’ या विषयावर गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले सेरम इन्स्टिट्यूटचे रायगड डीविजनचे सिनियर एरिया बिझिनेस मॅनेजर सुधीर द्रविड आणि टेरेटरी बिझिनेस मॅनेजर महेश केळकर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.

जगात कर्करोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाय लक्षात घेता कर्क रोगविषयी जनसामान्यत जागृती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. कर्करोग विशेषतः सर्विकल कर्करोग होऊ नये यासाठी सेरमने बाजारात नवीन वॅक्सीन आणली आहे. त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे आणि त्यांना वॅक्सीन घेण्यासाठी प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोरशेठ जैन यांनी पाहुण्यांचे स्वागत करत कोव्हिड 19 च्या जागतिक महामारीत जगाला जीवनाचा नवा किरण दाखवणार्‍या कोवीशिल्ड वॅक्सीन आणणार्‍या सेरम इन्स्टिट्यूटचे विशेष आभार मानले. सुधीर द्रविड आणि महेश केळकर यांनी कर्करोग आजाराविषयी सखोल माहिती देत व्हॅक्सीनचे डोस कसे घ्यावेत याबद्दल योग्य मार्गदर्शन केले. तसेच शेवटच्या तासामध्ये प्रश्‍न उत्तरे घेऊन विद्यार्थ्यांच्या अनेक समस्याचे निराकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य समीर पवार, फार्मसी विभागाचे कार्यालयीन अधिक्षक राजेश सुतार, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. मृगांका म्हात्रे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अन्वी ठमके यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सायली बुधवंत यांनी केले होते.

Exit mobile version