। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर येथील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका अॅल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी (दि. 11) संध्याकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
नागपुरातील उमरेड एमआयडीसीत एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत अॅल्युमिनियम फॉईल आणि पावडर तयार केली जाते. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. यावेळी 150 कामगार काम करत होते. स्फोटानंतर सर्वांनी बाहेर धाव घेतल्यामुळे अनेकांचे जीव वाचले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मात्र काहीजण आगीच्या गर्तेत अडकले. यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कंपनीतील हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.