कंपनी प्रशासनाकडून प्रकरण रफादफा, कामगारांच्या नावांची यादी लवकरच होणार प्रसिद्ध
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील नामांकित कंपनीत गेल्या आठवड्यात मोठा अपघात घडला. अनेकदा या कंपनीत असे प्रकार घडत असून कंपनी प्रशासन मोठ्या शिताफिने ही प्रकरणं रफादफा करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉयलरमध्ये मोठे प्रेशर आल्याने पीटमध्ये असलेल्या कामगारांवर बॉयलरमधून गरम द्रव्य पडले. यामध्ये होरपळून चौघांचा मृत्यू झाला.
यामध्ये दोन सख्ये भाऊदेखील काम करीत असून एकजण पाणी आणण्यासाठी गेला तेवढ्यातच हा प्रकार घडल्याने त्याचा जीव वाचला. मात्र सख्या भावाचा यामध्ये मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कोणत्याही रुग्णालयात त्याची नोंद आढळली नाही. मात्र कामगारांच्या नावांची यादी कृषीवलच्या हाती लागली आहे. सर्व शहानिशा करुन लवकरच ही यादी तसेच कंपनीचे नाव प्रसिद्ध करण्यात येईल. या कामगारांमध्ये 19 वर्षीय तरुणाचाही समावेश होता. जग बघण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने त्याच्या कुटूंबियांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली असता कंपनीत घडलेल्या अपघाताची अन्य विभागातील कामगारांनाही कानोकान खबर नसल्याचे दिसून आले. कंपनी प्रशासनाने तातडीने हे प्रकरण दाबून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मात्र हे सर्व करीत असताना मृत्यूची नोंद तसेच त्यांचा शवविच्छेदन अहवालाबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. तर मयत कामगारांपैकी सर्व कामगार हे परप्रांतिय असल्याने त्यांचे मृतदेह कंपनीने रस्त्यामार्गे नेले कसे? अन्य संबंधित विभागही आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत का?
याबाबतची माहितीही कृषीवलची टीम घेत असून लवकरच त्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. याबाबत कंपनी प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी असा कोणताही अपघात घडला नसल्याचे सांगितले. मात्र या घटनेनंतर कंपनीने संबंधित अधिकाऱ्यांची कामावरुन हकालपट्टी केल्याची माहितीही समोर आली आहे.