पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान सापडली स्फोटके

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी शहराच्या बाहेरील भागात जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाकडे जाणाऱ्या मार्गावर, कग्गलीपुरा भागातील थाथागुणी येथे पोलिसांना जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. एका पुलाजवळ आणि कंपाऊंडच्या भिंतीपाशी या जिलेटीन कांड्या टाकण्यात आल्या होत्या. पंतप्रधानांचा ताफा या मार्गावरून जाण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी या कांड्या शोधून काढल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, संशयित आरोपीनेच स्वतः पोलिसांना फोन करून स्फोटाची धमकी दिली होती. रविवारी पहाटे कोरामंगला येथील एका व्यक्तीने स्थानिक पोलीस ठाण्यात फोन केला. एचएएल विमानतळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राजवळ स्फोट होऊ शकतात, असा इशारा त्याने दिला होता.

Exit mobile version