पौष्टिक तृणधान्यांची निर्यात वाढली

| पुणे | वार्ताहर |

देशात उत्पादित होणाऱ्या पौष्टिक तृणधान्यांची सर्वाधिक निर्यात अरबी देशांना झाली आहे. प्रामुख्याने ज्वारी आणि बाजरीला मागणी आहे. पण, तृणधान्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना अद्याप नगण्य मागणी आहे. कृषी विभागातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 608 कोटी रुपये किंमतीच्या 1,69,042 लाख टन तृणधान्यांची निर्यात झाली होती. त्या संयुक्त अरब अमिरातीला सर्वाधिक 108 कोटी रुपये किंमतीच्या 34 हजार 17 टनांची, सौदी अरेबियाला 24 हजार 519 टन, नेपाळला 20 टन, जर्मनीला 10 टन, जपानला 27 टन आणि अमेरिकेला 21 टन आणि अन्य देशांना 80 टनांची निर्यात झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ऑक्टोंबरअखेर 327 कोटी रुपयांच्या 84 हजार 592 टन तृणधान्यांची निर्यात झाली असून, मागील वर्षा सारखीच सयुंक्त अरब अमिरातीला 15,079 टन, सौदी अरेबियाला 11,061 टन, नेपाळला 9,777 टन, जर्मनीला 1,809 टन, जपानला 3,714 टन, अमेरिकेला 1,543 टन आणि अन्य देशांना 41,609 टन तृणधान्यांची निर्यात झाली आहे.

जागतिक तृणधान्य उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 41 टक्के आहे. देशात तृणधान्यांचे उत्पादन प्रामुख्याने राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात घेण्यात येते. त्यात ज्वारी, बाजरी, नाचणीसह अन्य तृणधान्यांचा समावेश होतो. देशात उत्पादीत होणाऱ्या तृणधान्यांपैकी फक्त एक टक्का तृणधान्यांची निर्यात होते. तृणधान्यांची देशातून निर्यात होत असली तरीही तृणधान्यांवर प्रक्रिया केलेल्या पदार्थांची फारशी निर्यात होताना दिसत नाही.

तृणधान्यांच्या बियाणांना मागणी
तृणधान्यांबरोबरच तृणधान्यांच्या बियाणांही मागणी वाढली आहे. 2022-23मध्ये देशातून 26,934 टन ज्वारीची तर 553 टन ज्वारीच्या बियाणांची निर्यात झाली आहे. 52,266 टन बाजरीची तर 12,191 टन बाजरीच्या बियाणांची निर्यात झाली आहे. 2130 टन नाचणीची तर 21,130 टन नाचणीच्या बियाणांची निर्यात झाली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातून ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीला संधी
राज्यासह देशातून तृणधान्यांच्या निर्यातीला गती आली आहे. तृणधान्यांसह तृणधान्यांच्या बियाणांनाही मागणी वाढली आहे. पण, तृणधान्यांवर प्रक्रिया केलेल्या पदार्थांची निर्यात फारशी होताना दिसत नाही. भविष्यात प्रक्रियायुक्त तृणधान्य पदार्थांची निर्यात वाढण्यासाठी सरकार, प्रक्रियादार, निर्यातदारांनी एकत्र काम करण्याची गरज आहे, अशी माहिती कृषीमालाचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी दिली.

Exit mobile version