| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे सेक्टर 17 मधील जय गुरुदेव कॉम्प्लेक्सजवळ तसेच परिसरातील अनेक ठिकाणी महावितरणच्या विद्युत वितरण पेट्या (डीपी) उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डीपीमधील उघड्या वायरींमुळे लहान मुले, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागण्याचा धोका असून, दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जय गुरुदेव कॉम्प्लेक्सजवळील डीपी रस्त्याच्या कडेला असल्याने या मार्गावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. परिसरात इंडो स्कूल असल्यामुळे विद्यार्थ्यांचाही वावर असतो. त्यामुळे उघड्या डीपींचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. या समस्येबाबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, वारंवार लक्ष वेधूनही आवश्यक उपाययोजना झाल्या नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. वीजबिल भरण्यास विलंब झाल्यास ग्राहकांना तत्काळ नोटिसा देणाऱ्या महावितरणने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
पनवेल परिसरातील सर्व उघड्या डीपींची तपासणी करून असुरक्षित वायरी बदलाव्यात, मजबूत झाकणे बसवावीत आणि सुरक्षित कुलूप लावावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा, संभाव्य धोका ओळखून महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.






