पनवेल पालिकेचा पर्यावरण अहवाल जाहीर
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेचा 2023-24 या वर्षाचा सद्यःस्थितीतील पर्यावरणाचा अहवाल वेळेत जाहीर करण्यात आला आहे. आयआयटी-बीने तयार केलेल्या या अहवालात तळोजा आणि कासाडी नद्यांचे प्रदूषण आणि हरितपट्ट्यात झालेली घट यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शहराचा विकास अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, तसेच शहरातील प्रदूषण व पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रदूषणाच्या सद्यःस्थितीचा अहवाल महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
पालिका हद्दीतील पर्यावरणाची सद्यःस्थिती दाखवणारा अहवाल दरवर्षी 31 जुलैपर्यंत जाहीर करणे अपेक्षित असते. पनवेल पालिकेनेही 31 जुलै रोजी प्रदूषणाचा अहवाल जाहीर केला आहे. अहवालात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीसाठी नागरी संस्थांनी आग्रह धरावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. तसेच नाल्यात सोडण्यापूर्वी सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सांगितले गेले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात 3 रिअल टाइम एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम स्थापित कराव्यात, लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित कराव्यात, अशा सूचना अहवालात करण्यात आल्या असून, बायोफिजिकल पर्यावरण, बदलांचे ट्रेंड, बदलत्या ट्रेंडचे परिणाम, पायाभूत संरचना गुणवत्ता, लोकसहभाग, कृती योजना विकसित करणे आणि पर्यावरणास अनुकूल शाश्वत शहरासाठी मार्ग तयार करण्यासाठी ईएसआर तयार करण्यात आला आहे. नागरी संस्थेच्या 9 टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्र हिरव्या अच्छादनाखाली आहे. जैवविविधतेच्या सविस्तर सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, वृक्षाच्छादनात घट झाली आहे आणि बांधकाम कामांमुळे झाडे तोडली जात आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी नदी नाल्यामध्ये सोडण्यास नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर नियम करणे सुचवण्यात आले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील रसायनिक सांडपाणी नदी नाल्यात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने नद्या, तलाव आणि तलावांसह सर्व जलस्रोतांची नियमितपणे योग्य उपकरणे वापरून साफसफाई करणे आवश्यक आहे.
महामार्गाच्या दुतर्फ झाडे लावा
अहवलाच्या निष्कर्षानुसार महामार्गाच्या कडेला आणि इतरत्र वृक्षलागवड करून हवेतील घातक घटक कमी केले जाऊ शकतात. तसेच महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावल्याने ध्वनीप्रदूषणही कमी होईल.