मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा !

मत्स्य दुष्काळ रोखण्यासाठी मच्छीमारांचा पर्याय

। रायगड । प्रतिनिधी ।

यंदाच्या मत्स्य हंगामात समुद्रात माशांचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. या मत्स्य दुष्काळाचा फटका मच्छीमारांना चांगलाच बसला. त्यासाठी माशांच्या प्रजोत्पादनाच्या कालावधीत मच्छीमारांकडून माशांच्या अत्यंत लहान पिलांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी हा फेब्रुवारी, मार्च आणि दरवर्षीप्रमाणे जून, जुलै असा करण्यात यावा, अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून पुढे येत आहे.

ऑगस्टपासून मत्स्य हंगाम सुरू होताच पापलेट, दाढा, घोळ, रावस यांची मासेमारी केली जाते, तर सप्टेंबरपासून बोंबील, काटी, मुशी अशा लहान माशांची मासेमारी होते. या वेळी जाळ्यात अडकणारा प्रत्येक मासा हा अंड्याने भरलेला असतो. ही अंडी डिसेंबरपर्यंत पूर्णपणे समुद्रात सोडतो आणि त्यातूनच अत्यंत लहान पिल्ले जन्माला येतात, मात्र या वेळी लहान-मोठ्या आसांच्या जाळ्यांनी सतत मासेमारी सुरू असते. परिणामी, अगणित माशांच्या लहान पिल्लांची कत्तल होते. आपट्याच्या पानाच्या आकाराची अत्यंत लहान पापलेटची अगणित पिल्ले सुकत टाकलेली दृष्टीस पडतात. शिवाय पापलेट, दाढा, घोळ, रावस अशा किमती माशांच्या मासेमारीसाठी जी मोठ्या आसाची जाळी वापरली जातात, त्यात गाडीभर लहान बोंबील, सुकट अडकून मरून जातात. ती पुन्हा समुद्रात फेकून दिली जातात. जून ते 31 जुलैपर्यंतची पावसाळी मासेमारी बंदी ही केवळ मत्स्य संवर्धनासाठी असते. या कालावधीत कोणत्याही माशांचे प्रजोत्पादन होत नाही. त्यासाठी माशांच्या लहान पिलांची कत्तल थांबवायची असेल, तर फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान मासेमारी बंदी करण्यात यावी. तसेच त्यानंतर नेहमीप्रमाणे 1 जून ते 31 जुलैपर्यंत पावसाळी मासेमारी बंदी करण्यात यावी. त्यामुळे मत्स्य दुष्काळ संपवण्यास मदत होईल. एप्रिल, मेमध्ये मच्छीमारांना मासेमारी करता येईल, अशी मागणीही पुढे येत आहे. कोरोना काळात गुजरात आणि महाराष्ट्रामधील हजारो मच्छीमारी टॉलर, तसेच अन्य मासेमारी नौका बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी, समुद्रात माशांची प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे मागील मत्स्यव्यवसाय हंगामात मच्छीमारांना मत्स्य दुष्काळ जाणवला नाही आणि त्यांना चांगले उत्पादन मिळाले होते. त्यामुळे मासेमारीचा कालावधी वाढण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version